अन्‌ उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरच्या बोगद्यात कॉलर उडवली... - For this reason, Udayanraje blew the collar in the tunnel of grade separator ... | Politics Marathi News - Sarkarnama

अन्‌ उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरच्या बोगद्यात कॉलर उडवली...

उमेश बांबरे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

आम्ही जे बोलतो ते करून दाखविले असून यामुळेच लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सातारच्या जनतेने आजपर्यंत ज्या विविध पदावर मला निवडून दिले. त्याची सुरवात नगरसेवक पदापासून झाली. कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष मंत्री, खासदार हे सर्व जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे झाले.

सातारा : साताऱ्यातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाची पहाणी आणि उद्‌घाटन आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी पहाणी करताना बोगद्यात कॉलर उडवली. त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, इतरांची जशी स्टाईल असते. तशी माझीही स्टाईल आहे. मी केलेल्या कामाबद्दल मला कोणी शाबासकी देऊ न देऊ स्वतः ला शाबासकी देण्याची ही माझी पध्दत आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा कॉलर उडवली अन्‌ कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

ग्रेड सेपरेटरच्या कामाचे आज अचानक खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्‌घाटन केले. यावेळी त्यांच्यासमवेत यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उप नगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. दत्तात्रय बनकर, निशांत पाटील, मुख्याधिकार अभिजित बापट, तसेच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पहाणीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, सातारकरांसह माझ्यासाठी आज हा ऐतिहासिक क्षण असून लोकांची मागणी होती. पोवईनाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. तेथे वाहतूकची कोंडी होत होती. पर्यटक, व्यापारी व नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता. सातारा विकास आघाडी पालिकेच्या सत्तेत आली.

त्यावेळी नेहमीप्रमाणे आम्ही याबाबतच आश्वासन दिले होते. त्याची प्रत्यक्ष
कृती आम्ही केली आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखविले असून यामुळेच लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. सातारच्या जनतेने आजपर्यंत ज्या विविध पदावर मला निवडून दिले. त्याची सुरवात नगरसेवक पदापासून झाली. कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष मंत्री, खासदार हे सर्व जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळे झाले.

आज ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. तसेच सातारच्या जनतेची साथ मिळाली. या अगोदरही जी वचने आम्ही दिली ती पूर्ण केली आहेत. यापुढे देखील सातारकरांसाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे लोक आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी व उज्वल वाटचालीसाठी प्रयत्न करत राहणार आहे.  कुठेही कमी पडणार नाही.

ग्रेड सेपरेटर काम ७६ कोटींचे असून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवईनाक्यावरील स्मारक ही भव्य दिव्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात
८० लाखांचे इस्टीमेट आहे. पण आम्ही अडीच कोटींचा प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही गप्प बसणार नाही. वाढीव निधी मिळविणार आहोत. महाराष्ट्राला अभिमान वाटाचा असे स्मारक पहायला मिळेल.

ऐतिहासिक साताऱ्याला शोभेल असा हा ग्रेड सेपरेटर झाला असून 
सातारकरांसह माझ्याही डोळ्याचे पारणे फिटले आहे.  अचानक घेतलेल्या या उद्‌घानामुळे काही नेते नाराज होतील, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, जनता सुखी तर सर्व सुखी. मी कोणाचा विचार करत नाही. आजच हा ग्रेड सेपरेटर जनतेसाठी खुला झाला, असे सांगून त्यांनी सिंगम चित्रपटातील जयकांत सिखरेच्या अभी के अभी...या डायलॉगची आठवण करून दिली. 

ग्रेड सेपरेटरच्या पहाणीवेळी बोगद्यात तुम्ही कॉलर उडवली त्यातून तुम्ही काय सांगणार होता, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मला वाटत इतरांची जशी स्टाईल असते तशी माझी ही स्टाईल आहे. मी केलेल्या कामाची मला शाबासकी कोणी देऊ न देऊ. मला स्वतःला  शाबासकी देण्याची ही माझी पध्दत आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली. अन्‌ उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

मला धक्का देण्याची सवय आहे....

अचानक उद्‌घाटन घेण्यामागचे कारण विचारले असता उदयनराजे म्हणाले, मला धक्का देण्याची सवय आहे. हा धक्का कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वतः ला बसतो. जुन्या सवयी जात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट करताच आता राजकिय धक्का देणार का, या प्रश्नावर त्यांनी मी कधीही राजकारण केलेले नाही. मला ते जमणारही नाही. लोकांसाठी समाजकारण केले ते जनतेच्या हितासाठी केले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख