या कारणांसाठी रोखले उपजिल्हा रूग्णालयातील रा. स्व. संघाचे सामाजिक कार्य
For this reason, the resident of the sub-district hospital was stopped RSSs Social work of the team

या कारणांसाठी रोखले उपजिल्हा रूग्णालयातील रा. स्व. संघाचे सामाजिक कार्य

संपूर्ण सातारा जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना कराडमध्ये मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विरूध्द काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतूरा रंगला आहे.

सातारा : कोरोनाच्या काळात कोविड योध्यांना मदत म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते कराडातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात (Venutai Chavan Sub-District Hospital) शासनाची रितसर परवानगी घेऊन मदत करत होते. याला युवक काँग्रेसच्या (Youth Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आक्षेप घेतला. संघाचे कार्यकर्ते त्यांच्या गणवेशात येवून मदतीच्या नावाखाली राजकीय अजेंडा राबवत असल्याचा आरोप करत त्यांचे काम बंद करण्याची मागणी केली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संबंधितांवर योग्य ती कारवाईचे आश्वासन देत युवक काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत संघाच्या कार्यकर्त्यांना ताकीद देवून त्यांच्या मदतीचे काम थांबविले. (For this reason, the resident of the sub-district hospital was stopped RSSs Social work of the team)

हा वाद सुरू असतानाच यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी उडी घेत संघाची बाजू घेतली. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सामाजिक काम करताना विशिष्ठ
गणवेशात काम करणे योग्य नाही. असा प्रकार पुन्हा होवू नये, अशी ताकीद त्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिली. 

 संपूर्ण सातारा जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना कराडमध्ये मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप विरूध्द काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतूरा रंगला आहे. याला निमित्त आहेत ते कराडातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना योध्यांना मदत करण्यासाठी गणवेशात जाऊन सामाजिक कार्य सुरू केले होते. उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण सुरू होते. तेथे हे कार्यकर्ते काम करत होते. त्यांचा तेथील नागरीकांशी वाद झाला.

याची माहिती युवक काँग्रसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांना समजली. त्यांनी तातडीने रूग्णालयात जाऊन यावर आक्षेप घेतला. श्री. मोरे यांनी उपजिल्हा रूग्णलायतील वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली. संघाने राजकीय हेतूने गणवेशात सुरू केलेले कथित समाजकार्य त्वरीत बंद करावे, अशी मागणी केली. तसेच संघाच्या कार्यकर्त्यांनी तेथे वाद घातल्याने आम्ही तेथे गेलो होतो. त्यांचा तो राजकीय अजेंडा असल्याचे लक्षात येताच त्याचा आम्ही निषेध केला आहे.

उपजिल्हा रूग्णालयाने त्यांना परवानगी दिलीच कशी हाच खरा प्रश्न आहे. त्याच्या चौकशी करावी अशी आम्ही मागणी केल्याचे युवकचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले. या वादानंतर वैद्यकिय अधीक्षकांनी संबंधितांना काम थांबवून तेथून बाहेर जाण्याची सूचना केली. त्यानुसार संघाचे कार्यकर्ते निघून गेले. दरम्यान, कोरोनाच्या आव्हानात्मक काळात शासकीय अधिकारी, सरकारी रुग्णालयातील डॉकटर्स, परिचारकांसह अन्य कोविड योद्धांना मदत व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शासनाची रितसर परवानगी घेऊन मदत करत होते.

त्याबाबत चुकीची माहिती पसरवून संघाच्या बदनामीचा कट केला जात आहे. तो चुकचा आहे, असे संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे व संदीप कुलकर्णी यांनी सांगितले. श्री. एकांडे व श्री. कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीत शासनाच्या संघ मदतीला असतो. तसाच यावेळीही मदतीला आलाय 18 ते 44 वयोगटातील नागरीकांची संख्या पाहता लसीकरण केंद्रांवर शासनाच्या मदतीसाठी सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक काम करत होता. तेथील वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश शिंदे यांची परवनागी घेतली होती.

मात्र खोडसाळपणे समाजामध्ये संघाची बदनामी करण्याच्या हेतूने काहींनी षड्यंत्र करत त्याची तक्रार केली. स्वयंसेवकांची लसीकरण केंद्रावर शासनावरील ताण हलका होण्यास निश्चितच मदत झाली होती. स्वयंसेवाकांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान केले होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत होता. स्वयंसेवकांचा नागरीकांशी वाद झाला असे त्यांचे म्हणणे कपोलकल्पित आहे. संघ स्वयंसेवक समाजाच्या मदतीला धावून आलेला पाहून त्यांची पोटदुखी झाली. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेली बदनामीची कृती निषेधार्थ आहे.

माध्यमांनाही धादांत खोटी माहिती सांगून बदनाची केली गेली ती चुकीची आहे, असेही त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. युवक काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांत झालेल्या या वादानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी संघाची बाजू घेत त्यांच्या कामाचे समर्थन केले. ते म्हणाले, कोरोनाचा प्रभाव वाढल्याने शासनाला सहकार्याच्या निस्वार्थी भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदतीला रस्त्यावर उतरला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीवर कऱ्हाडला युवक काँग्रेसने घेतलेला आक्षेप निषेधार्थ आहे.

तर कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीही संघाच्या पदाधिकाऱ्यांची बाजू घेत युवक काँग्रेसने केलेल्या या प्रकारावर ताशेरे ओढले आहेत. सौ. शिंदे म्हणाल्या, समर्पित भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत होता. त्यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. स्वयंसेवकांवर नोंदवलेला अक्षेप अत्यंत चुकीचा व राजकीय हेतूने प्रेरित आहेत. हा वाद थांबतोय तोच या वादात पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बाजू घेत संघाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. पालकमंत्री पाटील यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नाव न घेता त्यांनी गणवेशात येवून रूग्णांची सेवा करण्याचा प्रकार योग्य नसल्याची टिप्पणी केली. पुन्हा असा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याची सक्त सुचनाही उपजिल्हा रूग्णालयातील शासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in