सहकारी संस्थांच्या संचालकांना पुन्हा मुदतवाढ; निवडणूका पाच महिने पुढे ढकलल्या - Re-extension of directors of co-operative societies; Elections postponed by five months | Politics Marathi News - Sarkarnama

सहकारी संस्थांच्या संचालकांना पुन्हा मुदतवाढ; निवडणूका पाच महिने पुढे ढकलल्या

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

सहकारी संस्थांच्या निवडणूकांना एक वर्षांपेक्षा अधिक काळ मुदतवाढ देता येत नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाला असलेल्या नैसर्गिक अंतर्भूत सार्वभौम अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५७ मधील तसेच कलम ७३ कक मधील तरतूदीला सूट देऊन सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणूका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. पण पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूका आहे त्या टप्प्यावरून पुन्हा पाच महिने म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मात्र सामाजिक अंतराच्या अटीचे पालन करून होणार आहे. सहकाराच्या निवडणूका गेल्या वर्षापासून स्थगितीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सुरवातीला मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तीन महिने पुढे ढकलल्या होत्या.

त्यानंतर 18 मार्च, 17 जून, 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर डिसेंबर 2020पर्यंत मुदतवाढ दिली गेली. तर त्यानंतर 16 मार्चच्या आदेशानुसार 31 मार्च 2021पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शासनाने 16 जानेवारचा आदेश रद्द करून पुन्हा मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

त्यानुसार सातारा जिल्हा बॅंकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. पण कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या सर्व निवडणूका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मार्च पर्यंतची मुदतवाढ
संपल्याने निवडणूक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष  लागले होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग सर्वच ठिकाणी वाढला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे मानले जात आहे.  

कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित ठरणार नाही. पण सहकारी संस्थांच्या निवडणूकांना एक वर्षांपेक्षा अधिक काळ मुदतवाढ देता येत नाही. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाला असलेल्या नैसर्गिक अंतर्भूत सार्वभौम अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५७ मधील तसेच कलम ७३ कक मधील तरतूदीला सूट देऊन सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या आदेशातून सर्वोच्च व उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका मात्र, ठरल्याप्रमाणे होणार आहेत, असे आदेश कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख