`रामराजे-उदयनराजे मनोमीलन, एकमेकांना म्हणाले `टेक केअर!` - Ramraje - Udayanraje Manomilan | Politics Marathi News - Sarkarnama

`रामराजे-उदयनराजे मनोमीलन, एकमेकांना म्हणाले `टेक केअर!`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले.

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील गेल्या काही वर्षांच्या वादाला पूर्ण विराम मिळाल्याचे चित्र आज पहायला मिळाले. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास खासदार उदयनराजे शासकिय विश्रामगृहात रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. दोघांनीही राजघराण्याचा शिष्टाचार पाळत एकमेकांचे स्वागत केले. दोघांत तीन चार मिनिटे दिलखुलास चर्चा झाली. त्यानंतर पुण्याला जायचे म्हणून रामराजे निघाले. कोरोना असल्याने जाताना उदयनराजेंनी रामराजेंना 'टेक केअर', 'लवकरच भेटू' असे म्हणाले, तर रामराजेंनीही उदयनराजेंना 'काळजी घ्या...' असे सांगितले. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजेंच्या रागीट स्वभावामुळे यात यश आले नाही. त्यानंतर दोघांत लोकसभा निवडणुक होईपर्यंत वाद सुरू होता.

हा वाद इतका विकोपाला गेला होता. उदयनराजेंनी एकेदिवशी फलटणला जाऊन तेथील शासकिय विश्रामगृहात जाऊन रामराजेंना चॅलेंज केले होते. त्यानंतर हा वाद संपूर्ण निवडणुकीत पहायला मिळाला. निवडणुकीनंतर वाद पुन्हा बाजूला पडला. पण आज सातारच्या शासकिय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. जिल्हा बॅंकेची सभा उरकून रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते.

त्यांच्याकडे कामानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व इतर काहीजण थांबलेले होते. सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान, शासकिय विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले.

त्यामुळे शासकिय विश्रामगृहात उपस्थित आवक्‌ झाले. त्यांना काय होणार हे समजायच्या आत उदयनराजे रामराजे बसलेल्या सुटमध्ये पोहोचले व उभे राहिले. उदयनराजेंना पाहून रामराजेंनी या महाराज असे म्हणून राजघराण्याचा शिष्टाचार पाळत दोघांनीही एकमेकांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिले व उदयनराजे कोचवर बसले. तोपर्यंत इतर कायकर्ते सुटमधून बाहेर निघून गेले.

सुमारे चार पाच मिनिटे दोघांनी चर्चा केली. तोपर्यंत बाहेर उपस्थित असलेल्यांना काय होतंय काय नाही, या विचाराने अस्वस्थ केले होते. दोन्ही राजांनी अल्पवेळ चर्चा केल्यानंतर रामराजेंनी आम्हाला पुण्याला जायचे आहे. असे म्हणत निघुया म्हणाले. त्यानंतर दोन्ही राजांनी एकमेकांचा निरोप घेतला. जाताना उदयनराजेंनी रामराजेंना 'टेक केअर'...'लवकरच भेटू' असे म्हणताच रामराजेंनी ही 'टेक केअर तुम्हीही काळजी घ्या..'असे म्हणत विश्रामगृहातून दोघेही बाहेर आले. त्यानंतर रामराजे गाडीतून पुण्याकडे रवाना झाले. तर उदयनराजे जलमंदीर पॅलेसकडे रवाना झाले. 
.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख