पंढरपुरातील कारवाईचा निषेध; वारकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नका.... - Protest of action in Pandharpur; Don't wait for the outbreak of Warakaris .... | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपुरातील कारवाईचा निषेध; वारकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नका....

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

प्रत्येक मठात जाऊन वारकरी वर्गास पंढरी क्षेत्राबाहेर काढत आहेत, ही बाब लाजीरवाणी आहे. नवीन वारकऱ्यांना प्रवेश देणे शक्‍य नसेल तर हरकत नाही. मात्र, जे अगोदरपासून तिथे आहेत त्यांना आदराने वागवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

दहिवडी : आषाढी, कार्तिकी वारी दरम्यान वारकरी संप्रदायाने समन्वयाची भूमिका घेऊन शासन निर्णयाचे स्वागतच केले; पण माघ वारीदरम्यान प्रशासनाने पंढरीतील मठात जाऊन धरपकड सुरू केली आहे. प्रशासनाचे हे कृत्य अतिशय संतापजनक असून, प्रशासनाने वारकरी संप्रदायाच्या उद्रेकाची वाट पाहू नये, असा इशारा वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी दिला आहे. 

दर वर्षी माघ वारीला लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र, कोरोनाचे संकट पाहता दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे, हे मान्य आहे; पण शासनाला जर नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर त्या नियमांची स्वतः जाणीव करून घ्यावी व नियम पाळण्याची सुरुवात स्वतःपासून करावी.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांना नियम लागू होत नाहीत. तेथे नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. मात्र, धार्मिक कार्यक्रमांवर मात्र नियम कठोरपणे लागू होतात. जो केवळ कीर्तन, भजन व वारी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये येतो व इतर ठिकाणी जात नाही. प्रशासनाच्या एकंदरीत
वागणुकीवरून तरी आम्हाला असेच दिसते, अशी टीका  अक्षयमहाराजांनी केली.

"संतापाशी बहू असावी मर्यादा' संतांजवळ मर्यादेने वागले पाहिजे, याची शिकवण प्रशासनास देण्याची आवश्‍यकता आहे. जे वारकरी बांधव अत्यंतिक निष्ठेने आपला आचार धर्म, संप्रदाय नियमावली सांभाळत आहेत. ते तो मोडला जाऊ नये म्हणून पंढरी क्षेत्रात वास करीत आहेत. कोरोनाची एवढी भीती आहे तर वारी आधी दोन महिने ती काळजी घेणे गरजेचे होते. आज प्रत्येक मठात जाऊन वारकरी वर्गास पंढरी क्षेत्राबाहेर काढत आहेत, ही बाब लाजीरवाणी आहे. नवीन वारकऱ्यांना प्रवेश देणे शक्‍य नसेल तर हरकत नाही. मात्र, जे अगोदरपासून तिथे आहेत त्यांना आदराने वागवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख