महाबळेश्वरात पर्यावरणपूरक विकासालाच प्राधान्य : उद्धव ठाकरे

पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावित. विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. जे काम करू त्या कामाचे डिझाईन, काम सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीख, कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे फलक लावावेत.
Priority for environment friendly development in Mahabaleshwar Says CM Uddhav Thackeray
Priority for environment friendly development in Mahabaleshwar Says CM Uddhav Thackeray

सातारा : महाबळेश्वरचा पर्यटन विकास करताना तो पर्यावरणपुरक होईल, यावर भर देण्यात यावा. महाबळेश्वरची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी वेण्णा तलावाची उंची वाढविणे, तलाव परिसराचा विकास करणे, शॉपिंग एरियाचा विकास करणे तसेच पोलो ग्राउंड तयार करणे या कामांचे प्रस्ताव जलदगतीने सादर करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

महाबळेश्वरचा पर्यटन विकासाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, पंकज जोशी उपस्थित होते.

 सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाइनच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाबळेश्वर पर्यटन आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि अधिक कालावधी स्वरूपात आराखडा करून कामाची वर्गवारी करावी. त्याची टप्पानिहाय अंमलबजावणी करावी. असे करताना कमी कालावधीची जी कामे तात्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे.

महाबळेश्वर मार्केट, रस्ता रुंदीकरण व लेक परिसर याची कामे जी तत्काळ सुरू करता येतील ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत. पर्यटनाला दर्जा रहावा, पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावित.  विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. जे काम करू त्या कामाचे डिझाईन, काम सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीख, कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे फलक लावावेत.

ही कामे झाल्यास पर्यटक वाढतील, पर्यायाने स्थानिकांना लाभ होईल हे त्यांना समजावून सांगावे. वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.महाबळेश्वरमध्ये पोलो मैदानाचा विकास करताना ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे.

त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे, पण त्यास केंद्रीय वन संवर्धन कायद्यांतर्गत केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्या मैदानाचे सपाटीकरण केल्यास तिथे पोलो स्पर्धा आयोजित करता येतील. हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. 

महाबळेश्वरमध्ये 5 एमएलटी पाणी क्षमता आहे, ती 19 एमएलटीपर्यंत वाढवता येऊ शकेल, त्यामुळे तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी. बाजारामधून पाणी निचरा होणाऱ्या नाल्या बंदिस्त कराव्या , त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून त्यात एक समानता आणण्यास मदत होईल, अशा सूचना यावेळी दिल्या.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याचा विकास करताना तो पर्यावरणपुरक व्हावा यावर भर दिला जात आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याचा समतोल साधला जाईल हे पाहणे गरजेचे आहे. महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची यादृष्टीने अंमलबजावणी केली जाईल.

सध्याच्या पायाभूत सुविधा 2011 च्याच आहेत, पण पर्यटक मोठ्या संख्येने वाढले, हे लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी करता येईल. 2001 मध्ये महाबळेश्वर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाले. देशातील हा पहिला इको सेन्सेटिव्ह झोन असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने उच्चधिकार समिती स्थापन केली आहे.

त्यांच्या परवानगीशिवाय येथे कोणतेही विकास काम करता येत नाही. 2014 मध्ये प्रमुख पर्यटन आराखडा तयार केला. पण तो विषय नंतर पुढे गेला नाही. महाबळेश्वरमध्ये रोज 17 ते 18 हजार पर्यटन क्षमता आहे, परंतु सिझनमध्ये 35 ते 40 हजार पर्यटक येतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

वेण्णालेक परिसराचे सुशोभिकरण...

वेण्णालेक परिसर 31 जानेवारीपर्यंत सुशोभित करावा. महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे. यात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, हेरिटेज पर्यटन, धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्राचा समावेश करता येईल. आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com