फलटण-लोणंद-पुणे रेल्वेस सुरवात; कै. हिंदूराव नाईक निंबाळकरांचे स्वप्न पूर्णत्वास

रेल्वे मार्गासाठी वडील कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी २३ वर्षे संघर्ष केला. आज त्यांचे स्वप्न पुर्ण होत आहे. परंतू ते आज हयात नाहीत याचे दुःख आहे. परंतू त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याने आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
Phaltan-Lonand-Pune railway started; Late Hindurao Naik Nimbalkar's dream come true
Phaltan-Lonand-Pune railway started; Late Hindurao Naik Nimbalkar's dream come true

फलटण शहर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकासाची दृष्टी आहे. देशातील रेल्वेचे चित्र बदलावे ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. स्वच्छतेवर विशेष ध्यान देण्यात आल्याने स्वच्छ भारत अभियानात रेल्वेची व्यवस्थाच आदर्श भारताची एक प्रेरणा बनली आहे. फलटण-पुणे लोहमार्गाचे कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात आहे, याचा आपणास मनस्वी आनंद आहे, असे मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा जावडेकर यांनी दिल्ली येथून ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीष बापट, आमदार चंद्रकांत पाटील, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल हे ऑनलाईन उपस्थित होते.

फलटण रेल्वे स्थानकातील व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, मंडल रेल प्रबंधक सौ. रेणू शर्मा, अतिरिक्त महाप्रबंधक बी. के. दादाभाई, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनिल मिश्रा, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, श्रीमती मंदाकीनी नाईक
निंबाळकर, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, तहसिलदार समिर यादव उपस्थित होते.

या रेल्वेच्या माध्यमातून फलटण हे थेट पुण्याशी जोडले जाणार आहे. याचा फायदा शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी या सर्वांना होणार असल्याचे निदर्शनास आणून देऊन श्री. जावडेकर म्हणाले, रेल्वेतील पुर्वीचे दुर्गंधीयुक्त फलाटांचे चित्र बदलले आहे. मुख्य मार्गांवरील रेल्वेतील आधुनिक बायो स्वच्छतागृहे, स्वच्छ रेल्वे पटरी व रेल्वे स्थानके यामध्ये अनेक बदल झालेले दिसत आहेत. अनेक वर्षे रेल्वे धीम्या गतीने चालत होती.

त्यामध्ये आधूनिक तंत्रज्ञानाचे बदल झाल्याने आता तीने वेग घेतला आहे. या पाठीमागे पंतप्रधान मोदी यांची रेल्वेचे चित्र बदलण्याची इच्छा व रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची उत्कृष्ट कार्यशैली कारणीभूत आहे. रेल्वे मार्गासाठी वडील कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी २३ वर्षे संघर्ष केला. आज त्यांचे स्वप्न पुर्ण होत आहे. परंतू ते आज हयात नाहीत याचे दुःख आहे. परंतू
त्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याने आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

या रेल्वेसाठी रेल्वे मंत्री पियूष गोयल, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील व रेल्वेच्या अधिकार्यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच फलटणकरांना या रेल्वेचे दालन उघडे झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रारंभी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. यानंतर दिल्ली येथुन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर फलटण येथे उपस्थित मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्य वाणिज्य निरीक्षक संजीव सोन्ना यांनी केले. सौ. रेणू शर्मा यांनी आभार मानले.

उदयनराजेंची मागणी अन्‌ टाळ्यांचा कडकडाट....
फलटणच्या रेल्वे मार्गासाठी कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांच्या संघर्षामुळेच रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे फलटण लोणंद पुणे या रेल्वेला 'लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर' असे नाव देण्यात यावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात समर्थन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com