सातारा : सातारा जिल्हा हा काही भिडेंच्या मालकीचा नाही. त्यामुळे या जिल्ह्यात नियमित मी येईन आणि छत्रपतींना वंदन करेन. आपल्या देशात लोकशाही आहे, पेशवाई किंवा हुकूमशाही नाही. त्यामुळे भिडेंच्या झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाहीत, असा इशारा इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.
हिंदूत्ववादी संघटना तसेच शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांनी श्रीमंत कोकाटे यांना साताऱ्यात फिरकू न देण्याचा इशारा दिला होता. याला श्री. कोकाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सडेतोड उत्तर दिले आहे. कोकोटे यांनी पत्रकात म्हटले की, सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज याच्या कार्याने व पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनाने पावन झालेला जिल्हा आहे. सातारा जिल्हा हा काही भिडेंच्या मालकीचा नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मी नियमित येईन आणि छत्रपतींना वंदन करेन. आपल्या देशात लोकशाही आहे, पेशवाई किंवा हुकूमशाही नाही. त्यामुळे भिडेंच्या झुंडशाहीला आम्ही घाबरणार नाहीत.
कोणी कोठेही जावे, कोणी कोठेही यावे, कोणी राहावे, हे ठरविण्याचा अधिकार भिडेंच्या दहशतवाद्यांना नाही. संविधानाने संचार, निवास स्वातंत्र्य, दिलेले
आहे. त्यामुळे भिडेंच्या दहशतीला आम्ही घाबरणारे नाहीत. कारण आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. ठोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ.
दहशतीच्या बळावर खोटा इतिहास माथी मारणाऱ्यांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा. सातारा जिल्हा शिवरायांचा आहे, भिडेंच्या मालकीचा नाही. मी रोज साताऱ्यात येईन, असे प्रतिउत्तर श्री. कोकाटे यांनी हिंदूत्ववादी संघटना व शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी यांना दिला आहे.

