अरेरे! उपचाराअभावी दोघांचा मृत्यू, सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांकडे

जिल्ह्यात उपचाराविना मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची भिती यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी आता गांभीर्याने घेऊन तातडीने व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा असलेले सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Satara Corona
Satara Corona

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांकडे वाटचाल करू लागला आहे. परिणामी वाढलेल्या रूग्णसंख्येमुळे बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराअभावी मृत्यू होण्याचे प्रमाण वाढणार आहे. खटाव तालुक्यातील मायणी येथे धाप लागलेल्या रूग्णाला उपचार न मिळाल्याने तर कऱ्हाडला व्हेंटिलेटर नसल्याने व्यापाऱ्यास जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची
संख्य १५४ झाली आहे. सध्या विविध रूग्णालयात २४७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

 सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या दररोज दोनशेच्या वर गेली आहे. त्यामुळे रूग्णांवर उपचारासाठी शासकिय तसेच खासगी रूग्णालयातील बेडही कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर एमआयडीसीत उभारण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत बाधित पण गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अवघड झाले आहे.

कऱ्हाडला उपचार सुर असलेल्या भाजी मंडईतील व्यापाऱ्यास केवळ वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना धाप लागली व कोविडची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, कोविडच्या तीनपैकी एकाही रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. 

कोविडचे रुग्ण वाढत असल्याने कऱ्हाड शहरातील रुग्णालये "हाउसफुल्ल' आहेत. त्यामुळे कोविडचा त्रास होणाऱ्यांना येथे बेड आणि व्हेंटिलेटर शिल्लक नाहीत, अशी स्थिती वारंवार निदर्शनास येत असून, यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची आग्रही मागणी होत आहे. तर मायणी येथील रूग्णालयासमोर आलेल्या परजिल्ह्यातील रूग्णाला धाप लागली होती. त्याला ऑक्सिजनची आवश्यकता होती.

परिणामी त्याला रूग्णालयात घेऊन तातडीने उपचार करणे आवश्यक होते. मात्र, त्याला उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचाराविना मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची भिती यानिमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हा
प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी आता गांभीर्याने घेऊन तातडीने व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा असलेले सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com