कोरोना लस घेतल्यानंतर रेठऱ्यात एकाचा मृत्यू; रक्तदाबामुळे मृत्यू झाल्याचा जिल्हा चिकित्सकांचा निर्वाळा - One dies in relapse after being vaccinated against corona; Death due to high blood pressure | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना लस घेतल्यानंतर रेठऱ्यात एकाचा मृत्यू; रक्तदाबामुळे मृत्यू झाल्याचा जिल्हा चिकित्सकांचा निर्वाळा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

या मृत्यूची आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही सखोल चौकशी होईल. त्यामुळे त्याबाबत काही बोलणे योग्य नाही.'' दरम्यान, रक्तदाब वाढल्याने हा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. 

कऱ्हाड : कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज दुपारी रेठरे बुद्रुक येथे घडला. संपत राजाराम जाधव (वय 60) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. श्री. जाधव यांना कोरोना लस घेतल्यानंतर त्रास झाला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, रक्तदाब वाढल्याने हा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी; रेठरे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोनाची लस देण्यात येत आहे. आज जाधव यांनी दुपारी तीनच्या सुमारास कोरोनाची लस घेतली. ती लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास सुरू झाला. त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना त्वरित कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली झाल्या.

श्री. जाधव यांना कृष्णा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. वैद्यकीय सूत्रांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यंत्रणेचीही खळबळ उडाली आहे. त्याबाबत तालुका पोलिसात सायंकाळी उशिरा कोरोनाची लस घेतल्यानंतर श्री. जाधव यांचा आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. श्री. जाधव यांच्या मृत्यूबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

त्या म्हणाल्या, "रेठरे बुद्रुक येथे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्यासंदर्भातील सविस्तर अहवाल मागविला आहे. रेठऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल येईल. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. या मृत्यूची आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही सखोल चौकशी होईल. त्यामुळे त्याबाबत काही बोलणे योग्य नाही.'' दरम्यान, रक्तदाब वाढल्याने हा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख