सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्घाटन केलेल्या साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटनही लवकरच होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच तारीख ठरविली जाणार असून पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचे दुसऱ्यांदा उद्घाटन झालेले सातारकरांना पहायला मिळणार आहे.
सातारा शहरातील पोवईनाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे वाहतूकीची कोंडी होत असल्याने हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली
लावण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटरची योजना आखली. त्यानुसार ७५ कोटी रूपये खर्चून या ग्रेड सेपरेटरचे काम
झाले. त्यानंतर याचे उद्घाटन कधी होणार याची उत्सुकता सातारकरांना लागली होती.
मात्र, उदयनराजेंनी पहाणी करण्यासाठी आले व त्यांनी थेट उद्घाटनच करून टाकले. सध्या हा ग्रेड सेपरेटर नागरीकांसाठी खुला झाला असला तरी त्याचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अद्याप बांधकाम विभागाने दिलेला नाही. तसेच तो देखभाल दुरूस्तीसाठी कोणाकडे हस्तांतरीत होणार हेही ठरलेले नाही. त्यामुळे शासकिय कार्यवाही होणार का हा प्रश्न होता.
आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटन होणार आहे. त्यासाठी आम्ही बांधकाम विभागावर जबाबदारी सोपविली आहे. तसेच सध्या सुरू नागरीकांसाठी खुला असल्याने यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, त्याची माहिती घेऊन त्याची सुधारणा ही केली जाणार आहे.
तसेच नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिस विभागाकडून संपूर्ण शहरातच येत्या दीड महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. ग्रेड सेपरेटरमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरीकांच्या सुरक्षिततेची काळजी जिल्हा प्रशासन
घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

