रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत कोणीही राजकारण करू नये : बाळासाहेब पाटील - No one should do politics about remedivir injection: Balasaheb Patil | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत कोणीही राजकारण करू नये : बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 एप्रिल 2021

लसीकरणाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दुसरी लाट अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. मात्र ती स्थिती आटोक्यात आणण्यास राज्य शासनाने औद्योगिक कारणासाठी दिला जाणारा ऑक्सीजन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे.

कऱ्हाड : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठे बाजांवर राज्य शासनाने कारवाई केली आहे. यापुढेही अशा साठेबाजांवर शासन नक्कीच कारवाई करेल. इंजेक्शनची गरज असेल तरच ते द्यावे, असे आदेश आरोग्य विभागासह डॉक्टरांनाही सरकारने दिले आहेत. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनबाबत कोणी राजकारण करू नये. राज्यात जेवढा साठा आहे, त्याची ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी ते पोच करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

कराड शहरातील विविध भागात पालकमंत्री पाटील यांनी भेट देवून पहाणी केली. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. पोलिस, आरोग्य विभाग, कराड पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधिक्षक रणजीत पाटील, गट विकास अधिकारी आबासाहेब पवार, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते.   कोल्हापूर नाका येथे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन पुकारला आहे. त्यात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळली आहेत. आज त्या सगळ्याचा आढावा घेतला. शासकीय पातळीवर अतिशय समन्वयाने सर्व विभाग काम करत आहेत. त्यादृष्टीने सरकार मदत करत आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या लस कमी पडत आहे. तो तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासन टप्याटप्याने प्रयत्न करत आहे.

लसीकरणाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दुसरी लाट अचानक मोठ्या प्रमाणात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. मात्र ती स्थिती आटोक्यात आणण्यास राज्य शासनाने औद्योगिक कारणासाठी दिला जाणारा ऑक्सीजन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. तो ऑक्सिजन रुग्णांसाठी देण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्येही ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत आहे. त्या सर्वांना रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे आदेश दिले आहेत.

 रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठ्याबाबत ते म्हणाले, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असणाऱ्यांनाच ते द्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. त्याचा तुटवडा आहे हे नक्की. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई आहे. त्यावरही पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. काही राज्यांत याचा मुबलक साठा आहे. मात्र त्यांनी आपले इंजेक्शन बाहेर द्यायचे नाही असा निर्णय घेतला आहे. राज्यातही काही जणांकडे इंजेक्शनचा साठा मोठ्याप्रमाणात आहे. अशा साठेबाजांवरही सरकारने कारवाई केली आहे.

जनतेचे हित लक्षात घेऊन त्या इंजेक्शनचा साठा कोणीही करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. तसे करणाऱ्यावंर कारवाई होईल. त्यामुळे याचे कोणीही कृपा करून राजकारण करू नये. कारण राज्य शासनाचा हा साठा कानाकोपऱ्यातील रुग्णांना मिळावा असा प्रयत्न सुरू आहे. या इंजेक्शनचा साठा केंद्राकडे आहे. मात्र ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात ते राज्याला इंजेक्शन देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे त्यामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ती स्थिती लक्षात घेऊन केंद्राने मदत करणे अपेक्षित आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख