सातारा : सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उतरून महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल टाकले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद व आमदार शशिकांत शिंदे यांनी आज ल्हासूर्णे येथे पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाचा लेखाजोखा मांडताना त्यांनी सातारा पालिकेच्या निवडणूकीविषयी भाष्य केले. सातारा पालिकेच्या आगामी निवडणूकीबाबत ते म्हणाले, पवार व अजित पवारांनी मला विधान परिषदेची आमदारकी दिली त्यावेळी पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
सातारा पालिकेत महाविकास आघाडीचा प्रयत्न निश्चितपणाने केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणूकीत ताकदीने उतरेल. यापूर्वीही ही मी याबाबतचे भाष्य केलेले आहे. यासंदर्भात साताऱ्यातील अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यानंतर सातारा शहरात चांगल्या प्रकारचे वातावरण होऊन निवडणूकीत आम्हाला चांगल्या प्रकारचे यश मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात वेळे आली तर शिवेंद्रसिंहराजेंना घेऊन पालिकेची निवडणूक लढविणार का, या प्रश्नावर शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणूक कशी लढवायची हे पक्षश्रेष्टी ठरविणार आहेत. मात्र, अजित दादा काम करताना त्यांच्याकडे कामनिमित्त आलेला आमदार कोणत्या पक्षा आहे हे पहात नाहीत. त्यांना काम करण्याची आवड आहे. सातारा जिल्ह्यावर अजित पवार व खासदार शरद पवार यांचे विशेष प्रेम आहे.
भाजपच्या कारकिर्दीत विकासाच्या कारणाने काही लोक पक्ष सोडून गेली. पण भाजपच्या काळात झालेली कामे आणि पूर्वी आघाडी सरकारच्या काळात झालेली कामे पाहता सातारा जिल्ह्यात त्यावेळी शरद पवार व अजित पवारांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कामे झाली हे नाकारता येत नाही. शेवटी सातारकरांचे प्रश्न सुटावे म्हणून लोकप्रतिनिधींना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य म्हणून दादा त्यांना मदत करतात.
पण निवडणूक लागल्यानंतर पक्षपातळीवर काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्टी ठरवतील. जोपर्यंत पक्ष ठरवत नाही, तोपर्यंत पक्ष संघटना वाढविणे हे माझे कर्तव्य असून ते मी पार पाडणार आहे. मी कुणाला देखवाचे म्हणून राजकारण करत नाही. सातारा जिल्ह्याच्या दोन्ही टोकांपर्यंत विकास कामे करीन मी कोणाला नाराज करणार नाही. पक्षासाठी मी कोणाची नाराजी व वितुष्ट घेत नाही. परिणाम होत असतो. नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी झोकून देऊन मी काम करणार आहे.
पक्षाने माझ्यावर सातारा जिल्हा आणि नवी मुंबई या दोन ठिकाणची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पक्ष बांधणीचे काम सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, सातारा नगरपालिकेची निवडणूक महविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे, याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले, "सातारा शहरात राष्ट्रवादीच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.
दीपक पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वांना सोबत घेऊन एकत्रितपणे निवडणुकीची रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे." शशिकांत
शिंदे जावळीचे नाहीत, आता ते बाहेरचे म्हणजे कोरेगावचे झाले आहेत, या दीपक पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, "मी जावळीचा व सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे. आता मी विधानपरिषदेवर असल्याने माझे कार्यक्षेत्र व्यापक झाले आहे."
महाविकास आघाडी सरकारला धोका आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, "वावड्या उठवणे एवढेच विरोधाकांकडे काम आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून कॉंग्रेसची करण्याचा प्रयत्न करत सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे; परंतु तो यशस्वी होणार नाही."

