दहिवडी : माणमध्ये निवडणूक झालेल्या एकसष्ट पैकी चौतीस ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली असून मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरुन साथ दिली आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. आज ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याबाबतची माहिती दिली.
श्री देशमुख म्हणाले, माणमधील निवडणूक लागलेल्या ६१ पैकी १४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न केले. त्यामुळे या 34 पैकी इंजबाव, गंगोती, जाशी, तोंडले, भाटकी, मार्डी, मोही, लोधवडे, वाकी व हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादी विचाराच्या आहेत.
तर निवडणूक झालेल्या ४७ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. काळचौंडी, किरकसाल, कुकुडवाड, खडकी, गटेवाडी, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, जांभुळणी, डंगिरेवाडी, दिवडी, देवापूर, धामणी, पळसावडे, पानवण, पिंगळी बुद्रुक, भालवडी, रांजणी, वडजल, वर-म्हसवड, शिंदी खुर्द, शिंदी बुद्रुक, शिरवली व शेनवडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले आहे.
माणमधील सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरभरुन साथ दिली व मतरुपी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभारी आहे. मतदारांचा हा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू असा आशावाद ही श्री देशमुख यांनी व्यक्त केला.

