खंडाळ्यातील स्थानिकांची बाजू घेतली अन्‌ दोन लाखांच्या खंडणीची केस झाली.... - MP Udyanraje Bhosale open secret of khandala police case | Politics Marathi News - Sarkarnama

खंडाळ्यातील स्थानिकांची बाजू घेतली अन्‌ दोन लाखांच्या खंडणीची केस झाली....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

स्थानिकांची डोकेदुखी कमी व्हावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून त्यासाठी दिल्लीत दोन वकील तयार ठेवल्याचेही उदयनराजेंनी स्थानिकांना सांगितले.

सातारा : कास पठारावरून या भागातील गावांना जोडणारा रस्ता नेण्याऐवजी घाटाई मंदिराकडून नेण्यात आल्याचे सांगत एका स्थानिकाने त्यात राजकारण झाल्याचा आरोप केला. त्यावरून उदयनराजेंनी "फालतू बोलू नका, कसलं राजकारण. राजकारण करताय आणि म्हणताय, या राजकारणामुळे गजकरण झालंय. प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक आहे. स्थानिकांची अडचण होणार नाही, याकडे मी पाहीन. मध्यंतरी खंडाळ्यातील स्थानिकांच्या बाजूने उभा राहिलो आणि माझ्यावर दोन लाखांच्या खंडणीची केस झाली. ती कशी झाली, कुणी केली, जाऊ दे, असे गुपित खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम पालिकेकडून सुरू असून त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी कास येथील ग्रामस्थांनी आंदोलन करत काम बंद पाडले होते. या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्याबरोबरच कामाची पाहणी करण्यासाठी उदयनराजे हे त्या ठिकाणी गेले होते. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ॲड. दत्ता बनकर, वन विभाग तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

भिंतीच्या कामामुळे पाणीसाठा वाढणार असून काही स्थानिकांच्या सर्व जमिनी त्यात जाऊन ते भूमीहिन झाल्याच्या मुद्यावर उदयनराजेंनी पालिकेच्या ताब्यात असणारी जागा भूमीहिन स्थानिकांना हॉटेल व इतर व्यवसायासाठी देण्याच्या सूचना केल्या. वन विभागाच्या कार्यपध्दतीबाबत स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्‍न ऐकून उदयनराजेंनी भिंतीच्या कामासाठी अडीच वर्षे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी काय काय करावे लागले, हे माझे मलाच माहीत आहे. ते असू द्या. पण, कोणत्याही स्थानिकावर अन्याय होणार नसल्याचा शब्दही ग्रामस्थांना दिला. 

महाबळेश्‍वरसह इतर भागातील वनक्षेत्राच्या अनुषंगाने राज्य सरकारने आराखडा केला आहे. या आराखड्यात "वनसदृश जमिनी' असा उल्लेख असून तो भविष्यात महाबळेश्‍वर, पाचगणी, कास तसेच पाटणमधील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. स्थानिकांची डोकेदुखी कमी व्हावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून त्यासाठी दिल्लीत दोन वकील तयार ठेवल्याचेही उदयनराजेंनी स्थानिकांना सांगितले. कासच्या ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत ते म्हणाले, स्थानिकांची अडचण होणार नाही, याकडे मी पाहीन. मध्यंतरी खंडाळ्यातील स्थानिकांच्या बाजूने उभा राहिलो आणि माझ्यावर दोन लाखांच्या खंडणीची केस झाली. ती कशी झाली, कुणी केली, जाऊ दे, असेही उदयनराजेंनी सांगितले.
 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख