छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक दिनाबाबत उदयनराजेंनी घेतला महत्वपूर्ण निर्णय  - MP Udayanraje took an important decision regarding the coronation day of Chhatrapati Shahu | Politics Marathi News - Sarkarnama

छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक दिनाबाबत उदयनराजेंनी घेतला महत्वपूर्ण निर्णय 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 डिसेंबर 2020

यापुढे सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा पालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा दिवस साजरा केला जाणार असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने सातारा ही स्वराज्याची राजधानी सजविली. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात मोठा राज्य विस्तार याच सातारा राजधानीवरुन झाला.

सातारा : स्वराज्याची राजधानी साताऱ्याची स्थापना छत्रपती शाहू महाराजांनी केली. या संस्थापकांचा राज्याभिषेक दिन अवघ्या महाराष्ट्रात 'सातारा स्वाभिमान दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदापासून छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेकाच्या प्रत्येक दिनी म्हणजेच 12 जानेवारीला सातारा नगर पालिकेची विशेष सभा किल्ले अजिंक्‍यताऱ्याच्या राजसदरेवर घेण्यात येईल, अशी घोषणा राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

दरम्यान कोणत्याही किल्ल्यावर विशेष सभा घेण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान राजधानी साताऱ्याला मिळाला आहे. या घोषणेच्या वेळी नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, शिवकालचे अभ्यासक डॉ. संदिप महिंद गुरुजी, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर, संस्थापक सुदामदादा गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, कन्हैयालाल राजपुरोहित, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, मनोज पाटील, अमोल सणस, विक्रमसिंह पाटील, प्रशांत पवार आदी प्रमुख उपस्थित होते. 

साताऱ्याच्या शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने 12 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. तर गेल्या आठ वर्षांपासून सातारा स्वाभिमान दिन म्हणून या दिवसाचा लौकिक महाराष्ट्रात पसरला आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर अजिंक्‍यतारा किल्ला शहराच्या हद्दीत आल्याने अनेक तांत्रिक उणीवा आपोआपच बाजुल्या झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या घोषणेला विशेष महत्व आले आहे. 

यापुढे सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा पालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा दिवस साजरा केला जाणार असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने सातारा ही स्वराज्याची राजधानी सजविली. हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात मोठा राज्य विस्तार याच सातारा राजधानीवरुन झाला.

छत्रपती शाहु महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांची सावली आहे, असे इतिहासात वर्णन आहे. अखंड हिंदूस्थान एकसंघ बांधण्याचे काम शाहु महाराज यांनी केले, म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक दिन हा सातारा स्वाभिमान दिन म्हणून साजरा होत आहे. या उत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस भव्य दिव्य करण्यासाठी आम्ही स्वत: लक्ष घालत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख