सातारा : साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चा केली. तसेच राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढण्याची मागणी निवेदनाव्दारे केली. तसेच इतर विषयांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले सध्या आक्रमक झाले असून त्यांनी मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच मराठा आरक्षण प्रश्नात वडिलकीच्या नात्याने लक्ष घालावे, तसेच याबाबतच्या खटल्यात कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपण करू नये, अशी सूचना आपण राज्य सरकारला करावी, अशी मागणी केली होती.
तसेच आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्याचे राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली होती. अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा दिला होता. यानंतर आज उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर तासभर चर्चा झाली. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्यावर सर्वाधिक चर्चा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्द्यावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणी निवेदनाव्दारे केली.

