उदयनराजेंनी केली शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी; 'सिल्वर ओक'वर जाऊन घेतली भेट - MP Udayanraje inquires about Sharad Pawar's health; Visited Silver Oak | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंनी केली शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी; 'सिल्वर ओक'वर जाऊन घेतली भेट

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

भेटीनंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला असता, ते म्हणाले, मी पवार साहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यात सध्या अनेक राजकिय उलथापालथी सुरू आहेत, याप्रश्नावर त्यांनी मला काहीही माहिती नाही, असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले. 

सातारा : भाजपचे खासदार असूनही उदयनराजे भोसले यांनी केवळ नेत्यावरील प्रेमापोटी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तबेतीची चौकशी केली. यावेळी उदयनराजेंनी त्यांना तब्येतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मध्यंतरी पित्ताचा त्रास झाला होता. त्यानंतर तपासणी केल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रकियेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच शरद पवार नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसल्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. आज साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'सिल्वर ओक' या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशीही केली. त्यांनी श्री. पवार यांच्याशी तासभर चर्चा देखील केली.

यावेळी उदयनराजेंनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही श्री. पवार यांना दिला. उदयनराजेंनी श्री. पवार यांच्या घेतलेल्या भेटीची राजकिय वर्तूळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी लॉकडाऊन तसेच वाढलेला कोरोनाचा संसर्ग या विषयांवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाली.

भेटीनंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला असता, ते म्हणाले, मी पवार साहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज्यात सध्या अनेक राजकिय उलथापालथी सुरू आहेत, याप्रश्नावर त्यांनी मला काहीही माहिती नाही, असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख