साताऱ्यात लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा उदयनराजेंचा संकल्प...   - MP Udayanraje decides to bring military training center in Satara ... | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा उदयनराजेंचा संकल्प...  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा ह्या सातारची भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले हे सुद्धा प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशांतील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणाऱ्या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याचा संकल्प खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. यावेळी लष्करप्रमुख नरवणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट दिली. यावेळी त्यांनी साताऱ्यात लष्करी प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबतच्या आपल्या मागणीचे निवेदन ही त्यांनी दिले.

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून जिल्ह्यातील अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी छावणी उभारण्यात आली तर ती जवानांच्या शौर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल, असे सांगून उदयनराजे म्हणाले, ही छावणी जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा देणारी असेल. लष्कराच्या छावणीला पोषक असे वातावरण आणि सुविधा असल्यामुळे लष्कराकडून याचा नक्की विचार केला जाईल, अशी आशा व्यक्त केली.

लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा ह्या सातारची भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड किल्ले हे सुद्धा प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही.

सैनिकांच्या या जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करता येईल. तसेच या छावणीमुळे जिल्ह्यातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना व्यवसाय अथवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. ही छावणी सातारच्या वैभवात मोठी भर घालेल, अशी अपेक्षा त्यांनी लष्करप्रमुखांसमोर व्यक्त केली.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख