या कारणांसाठी उदयनराजेंनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन

सातारा जिल्हयासह महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यत केंद्र शासनाचे मोफत पुरविण्यात येणारे धान्य वेळेत आणि सुलभ रितीने तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न होता वितरीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
MP Udayanraje congratulated Narendra Modi for these reasons
MP Udayanraje congratulated Narendra Modi for these reasons

सातारा : देशातील गरीबातील गरीब जगला पाहिजे. या उदात्त धोरणातून मे आणि जुन या दोन महिन्यांकरीता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेतुन सातारा जिल्हयासह महाराष्ट्रात मोफत अन्नधान्य पुरवठा गरिबांपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने प्रसंगी एनजीओंचे सहकार्य घेवून प्रयत्न केले जातील, असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.   

यासंदर्भात खासदार उदयनराजेंनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, आजच्या खडतर काळात माणुसकीची बांधिलकी जपली पाहिजे.  आज भारत देश स्वयंपूर्णतेकडे जात असताना, कोरोना संकटाच्या जबडयात सापडला आहे. विकसित देश म्हणून उदयाला येत असताना, कोरोनाचा दुसरा तडाखा बसला आहे. या संकटावर मात करत असताना, संपूर्ण जगात कोरोनावर लस उत्पादन करणारा भारत हा महत्वपूर्ण देश ठरला आहे.

अशा परिस्थितीत कोरोना लसीकरण शक्य तितक्या लवकर करणे आणि दुस-या बाजुला कोरोनाग्रस्तांवर प्रभावी आणि सक्षम उपचार करणे अशी दुहेरी जबाबदारी प्रशासनावर आहे. कोरोनाकाळात, हातावरचे पोट असणा-या अनेक कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने पुढे आल्या आहेत.

कोणताही गरीब अन्नधान्यापासून वंचित राहु नये. म्हणून केंद्र सरकारने मे आणि जुन या दोन महिन्यांकरीता सुमारे २६ हजार कोटी रुपयांची  तरतुद करुन देशातील प्रत्येक कुटुंबाला गहु, तांदूळ मोफत पुरवण्याचे धोरण आखले आहे. या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतून देशातील 80 कोटी व्यक्तींना याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाकाळात, प्रशासनावर विशेष करुन सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसुल विभागांवर सध्या प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयासह महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यत केंद्र शासनाचे मोफत पुरविण्यात येणारे धान्य वेळेत आणि सुलभ रितीने तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न होता वितरीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. 

मोफत धान्य वाटपाबाबत आम्ही सातारा जिल्हयाच्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या केंद्राच्या मार्गदर्शक सुचना, तत्वे याचा विचार करुन कृती आराखडा तयार करावा. याकामी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या वितरण व्यवस्थेची माहिती घेऊन प्रसंगी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. प्रत्येक गरीबांपर्यंत धान्य कसे पोहोचेल. याबाबत आम्ही सर्व स्तरावर लक्ष पुरवणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com