उदयनराजेंनी विचारले कोरोनाचा व्हायरस शनिवारी, रविवारीच बाहेर येतो का..... - MP Udayanraje asked if the corona virus comes out on Saturday, Sunday only ..... | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजेंनी विचारले कोरोनाचा व्हायरस शनिवारी, रविवारीच बाहेर येतो का.....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

उदयनराजे म्हणाले, माझ्याकडे खायला अन्न नाही. घरातील उपाशी मरत असतील मी दुसऱ्याच्या घरात घुसून अन्न नेलेत तर त्याला चोरी म्हणू शकाल का. घरातील लोकांना उपाशी मरताना मी बघायचे का.

सातारा : मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झाले असतं तरी मी दुकान उघडं ठेवले असते. लॉकडाऊनमुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार रविवारच बाहेर येतो का, असा प्रश्‍न साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित करून शनिवार, रविवारच्या लॉकडाऊनची खिल्ली उडवली.

मिनी लॉकडाऊनच्या विरोधात आज व्यापाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस माजी सभापती सुनील काटकर, सुशांत निंबाळकर, राजेंद्र यादव तसेच सातारा व कराडातील व्यापारी उपस्थित होते. बैठकीनंतर उदयनराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले, शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध घालून दिले आहेत, हे बोलणे सोपं आहे. सध्या वातावरणात दोन मिलियनपेक्षा जास्त व्हायरस आहेत. आता कोरोना असला तरी प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती वाढविली पाहिजे. मास्क घातला तरी संसर्ग होऊ शकतो. लोकांनी पहिल्यावेळी ऐकले. आता लोकांची प्रशासनाचे ऐकण्याची मानसिकता राहिलेली नाही. सर्व काही ठप्प आहे. 

व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे, सणासुदीचे दिवस असून कर्ज काढून व्यापाऱ्यांनी माल भरला आहे. उद्या बॅंका त्यांच्या हप्ते भरण्यासाठी मागे लागणार आहेत. त्यामुळे कामगारांच्या लसीकरणासाठी वयाची अट शिथिल करावी. हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. उदयनराजे म्हणाले, मी मेडिकलचा स्टुडंट नाही पण एक कॉमन सेन्स मलाही आहे. मी सायन्स शिकलेलो आहे.

वयाची मर्यादा कमी केली तर कामगारांनाही लस देता येईल. कामगारांना लस दिली तरी देखील दुकाने उघण्यास परवानगी दिली जात नाही, मग कोण ऐकणार. मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झाले असतं तरी मी दुकान उघडं ठेवले असते. लॉकडाऊनमुळे माझ्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. 

शनिवार, रविवारी बंद ठेवताय कशाकरिता कोरोनाचा व्हायरस शनिवार रविवारच बाहेर येतो का, असा प्रश्‍न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांपुढे आम्ही सर्व प्रश्‍न मांडले आहेत. हा आपल्या येथीलच नव्हे देशातील प्रश्‍न आहे. पोलिस यंत्रणाही किती दिवस लोकांना अडविणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे.

पोलिस भरती होत नसल्याने त्यांची संख्या कमी आहेत. परिणामी ते परिस्थिती हाताळू शकत नाही. चोऱ्यामाऱ्या वाढल्या तर कोण जबाबदार, महाराष्ट्र शासन की जिल्हा प्रशासन, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, माझ्याकडे खायला अन्न नाही. घरातील उपाशी मरत असतील मी दुसऱ्याच्या घरात घुसून अन्न नेलेत तर त्याला चोरी म्हणू शकाल का. घरातील लोकांना उपाशी मरताना मी बघायचे का.

एवढे तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नाही. तुम्ही सरकारमध्ये सर्व तज्ञ लोक आहात. महाराष्ट्र राज्याची धुरा तुम्ही संभाळताय. आता संकट कोरोनाचे आहे, यापूर्वी अनेक संकटे आली. यामध्ये सार्स, एडस्‌चे होते, यावर कुठे लस तयार झाली. जिल्हाधिकारी म्हणतात दोन्ही प्रकारच्या लसी घेतल्या तरी कोरोना होणार नाही, असे सांगता येत नाही.

याबाबत राज्याच्या सत्तेतील किंवा लोकप्रतिनिधीही ठरवू शकत नाहीत. केवळ शास्त्रज्ञच ठरवू शकतात.मागे एकदा मास्क काढला. त्यावेळी ही हाच मास्क वापरा, तो चुकीचा आहे, असे सांगण्यात आले. याला जनता जबाबदार आहे का, एक, दोन दिवस लोक वाट पाहतील, मग कोण थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 प्रतिकारशक्ती वाढवली तरच तुम्ही वाचणार....

आता व्यापाऱ्यांनी काय भूमिका घ्यायची, कोल्हापूरप्रमाणे होणार का, यावर उदयनराजे भडकले म्हणाले, कोल्हापूर गेले खड्ड्यात, बाकीचे गेले  खड्ड्यात. मला तसे म्हणायचे नाही पण तुम्ही जिल्हे वेगवेगळे करू नका. तेथील परिस्थिती पहा ती सुध्दा माणसे आहेत. त्यांनाही वेदना आहेत. त्याच वेदनांना येथील लोकांनाही सामोरे जावे लागत आहे. कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे दक्षता घ्या. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो.. अशा माझ्या शुभेच्छा आहेत. जो जन्माला येतो त्या प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. तुम्ही काळजी घेऊन प्रतिकारशक्ती वाढवली तर तुम्ही बळी ठरणार नाही. यापूर्वी अनेक व्हायरसने माणसं मेली आहेत. माझ्या तब्येतीची मी काळजी घेतो, त्याप्रमाणे सर्वांनी काळजी घेतली पाहिजेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख