खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींचे जात प्रमाणपत्र बनावट; दाखला देणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात - MP Dr. Mahaswamy's caste certificate forged | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींचे जात प्रमाणपत्र बनावट; दाखला देणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल जात पडताळणी समितीने दिला. याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांनी तक्रार केली होती.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे तपास करीत आहे. गुन्हे शाखेचे एक पथक आज तडवळ (ता. अक्‍कलकोट) येथे रवाना झाले होते. बुळ्ळा यांनी खासदार डॉ. महास्वामी यांचा मूळ दाखला प्रवासादरम्यान गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलिसांत दिली होती. तर त्यानेच दाखला तयार करुन दिल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्याअनुषंगाने सखोल तपास करण्यासाठी बुळ्ळा याला शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल जात पडताळणी समितीने दिला. याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांनी तक्रार केली होती. जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सोलापूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांनी सखोल तपास करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक तडवळ येथे सकाळीच रवाना झाले. बुळ्ळा यांची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. बुळ्ळा यांनी खासदार डॉ. महास्वामी यांचा मूळ दाखला प्रवासादरम्यान गहाळ झाल्याचा अर्ज जात पडताळणी समितीला दिला होता. त्याअनुषंगाने हा तपास सुरु असून बुळ्ळा यांची सकाळी दहा वाजल्यापासून चौकशी सुरु होती. घराची झाडाझडी घेल्यानंतर आता बुळ्ळा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु केली आहे. परंतु, बुळ्ळा या प्रकरणात दोषी आहे की नाही, याबद्दल पोलिसांनी बोलण्यास नकार दिला.

.
आतापर्यंतची हकीकत...

- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट

- जात पडताळणी समितीने दाखला बनावट असल्याचा दिला निकाल; सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल

- मुख्य दंडाधिकारी यांच्या निकालानंतर खासदारांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव

- पुढील आदेश येईपर्यंत या प्रकरणात काही कारवाई करु नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला

- बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाच तपास शहर स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला

- गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे सखोल तपास

- गुन्हे शाखेचे पथक तडवळला (ता. अक्‍कलकोट); शिवसिध्द बुळ्ळा यांची सुरु आहे कसून चौकशी

- बुळ्ळा याला पोलिसांनी चौकशीसाठी घेतले ताब्यात; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार पुढील चौकशी
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख