कोविड लसीकरणासाठी मोदी सरकारने घातलाय सर्वसामान्यांच्या खिशात हात - The Modi government has put its hands in the pockets of the common man for covid vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड लसीकरणासाठी मोदी सरकारने घातलाय सर्वसामान्यांच्या खिशात हात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा अर्थसंकल्पिय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान-भारत) मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी ही मागणी श्री. चव्हाण यांनी केली आहे. 

कऱ्हाड : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक मार्च पासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. 35 हजार कोटींची अर्थसंकल्पिय घोषणा आणि भारत लसीचा सर्वात मोठा पुरवठादार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात घालत आहे, अशीही टीका श्री. चव्हाण यांनी केली आहे. 

कोव्हिड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 45 किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस घेण्याचे प्रावधान आहे. यामध्ये केंद्र शासनाने लसीची किंमत 250 रुपये प्रति डोस इतकी ठेवली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाने एक कोटी 65 लाख कोटी लसीचे डोस खरेदी केले होते. 12 फेब्रुवारी रोजी लोकसभेत दिलेल्या एका उत्तरानुसार प्रत्येक डोसची किंमत 210 रुपये होती. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील, आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य आहे. असे असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे? 

अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा अर्थसंकल्पिय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना (आयुष्मान-भारत) मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी ही मागणी श्री. चव्हाण यांनी केली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख