जिल्हा बँक निवडणूक : जावळीत शशीकांत शिंदेंना रोखण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक रांजणे रिंगणात

निवडणुकीत आमदार शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे असा सामना रंगलाच तर मतदारांचा दर वधारणार हे निश्चित आहे.
MLA Shivendrasinhraje's supporter Dnyandev Ranjane is contesting from Jawali
MLA Shivendrasinhraje's supporter Dnyandev Ranjane is contesting from Jawali

कुडाळ : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे आमदार शशीकांत शिंदे यांना बँकेत जाण्यापासून रोखण्यासाठी जावळी तालुक्यातूनच रणनिती आखण्यात आली आहे. यावेळी जावळीतुन जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांचे पती व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आमदार शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे जावळी सोसायटी  मतदारसंघातून जिल्हा बँकेवर बिनविरोध होण्याचे आमदार शशीकांत शिंदेंचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. MLA Shivendrasinhraje's supporter Dnyandev Ranjane is contesting from Jawali

जावळी तालुक्यात एकूण ४९ विकास सेवा सोसायटी आहेत. जिल्हा बँकेत आतापर्यंत सोसायटी मतदारसंघातून तालुक्यातून माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे, भिकू धनावडे, कै. राजेंद्र शिंदे, श्रीमती सुनेत्रा शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर गेल्या दोन निवडणुकीत जावळीचे माजी आमदार शशीकांत शिंदे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेले पहायला मिळत आहेत. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जावळीतील राजकीय गणिते पूर्णतः बदलून गेलेली आहेत. 

शशीकांत शिंदे यांचा कोरेगावमधून पराभव झाल्यामुळे आपले संपूर्ण राजकीय लक्ष जावळी तालुक्यावर ठेवले आहे. त्यामुळेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशीकांत शिंदे यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी अनेक सोसायट्यांचे ठराव घेऊन कमालीची तयारी केली आहे. त्यामुळे आमदार शशीकांत शिंदे यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही. दोन्ही बाजुंनी तालुक्यातील सोसायटी ठराव आपल्याच बाजुंनी असल्याचा दावा केला जात आहे. 

मात्र, ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.  श्री. रांजणे यांनी सोसायटी मतदारांच्या गाठी भेटींवर जोर दिला आहे, तर आमदार शिंदे देखील जावळीत तळ ठोकून आहेत. रांजणे यांना पडद्यामागून खरी ताकद कोणाची मिळत आहे, हे तालुक्यातील राजकीय जाणकारांना चांगलेच माहिती असल्यामुळे सोसायटी मतदार देखील चांगलेच भांबावून गेलेले पहायला मिळत आहेत. अशात बहुतांश सोसायट्या या कुडाळ, सायगांव भागात असल्यामुळे मतदारांची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. तर या निवडणुकीत आमदार शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे असा सामना रंगलाच तर मतदारांचा दर वधारणार हे निश्चित आहे.

वसंतराव मानकुमरेंची कसरत...

जावळी तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून वसंतराव मानकुमरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, ते ज्या जावळी सहकारी बँकेचे नेतृत्व करतात त्या बँकेची निवडणूक देखील तोंडावर आली आहे. त्यामुळे जावळी बँक ताब्यात ठेवण्यासाठी आमदार शशीकांत शिंदेंची मोठी मदत त्यांना होते. तर त्यांचे पूर्ण राजकारण जिल्हा परिषद निवडणुकीवर अवलंबून असल्यामुळे तीही निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे मानकुमरे बुचकुळ्यात पडलेले पहायला मिळतात. जर ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही तर त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच होणार. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com