रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेत एंट्री  - MLA Rohit Pawar as General Body Member of Rayat Shikshan Sanstha | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार यांची रयत शिक्षण संस्थेत एंट्री 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 19 जुलै 2020

आमदार रोहित हे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील वारस मानले जातात. धडाकेबाज कार्यशैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत.  

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी आमदार रोहित पवार व आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गांधी यांची निवड झाली आहे. आमदार रोहित हे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील वारस मानले जातात. धडाकेबाज कार्यशैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत.  

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

सुभाष गांधी यांनी संस्थेच्या आढळगाव व परिसरातील शैक्षणिक विकासात सतत पुढाकार घेतला. संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड झाली. एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिलच्या सदस्यपदी नगरच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांचीही निवड झाली.

गेली तीन वर्षे संस्थेच्या सचिवपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. कमी बोलत पारदर्शी कारभार करण्याचा त्यांचा शिरस्ता संस्थेच्या सर्वच वरिष्ठांनी पाहिला आहे. डॉ. कराळे यांचा अनुभव व सचोटीचा संस्थेने चांगला उपयोग करून घेतला. आता डॉ. कराळे यांना संस्थेच्या सर्वोच्च अशा एक्‍झिक्‍युटिव्ह कौन्सिलवर काम करण्याची संधी संस्थेच्या धुरिणांनी दिली आहे.

संस्थेत जनरल बॉडी व मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदावर दीर्घ काळ काम केलेले राजेंद्र फाळके, तसेच 1995 पासून जनरल बॉडी सदस्य व गेल्या 12 वर्षांपासून समन्वय समितीचे सदस्य म्हणून काम करीत असलेले शिक्षण तज्ज्ञ विजय सावळेराम तथा बाळासाहेब बोठे यांना मॅनेजिंग कौन्सिलवर निमंत्रित सदस्य म्हणून घेतले आहे.

 तसेच सहकार मंत्री व सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच कै. वाघोजीराव पोळ यांच्या स्नुषा निलिमा पोळ यांचीही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली आहे. तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. अनिल पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख