विरोधकांनी कोंडी केली तरी आमदार गोरेंचे कार्य निस्वार्थीपणे सुरूच राहणार.... - MLA Gore's work will continue selflessly even if the opposition makes a fuss says Devendra fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांनी कोंडी केली तरी आमदार गोरेंचे कार्य निस्वार्थीपणे सुरूच राहणार....

सल्लाउद्दीन चोपदार
सोमवार, 10 मे 2021

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून महिन्याला 29 कोटी डोस प्रतिमहिना उपलब्ध होणार आहेत. केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिवर इंजेक्शन आणि 1750 टन ऑक्सिजन दिला जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

म्हसवड : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे मायणी मेडिकल कॉलेज मधील कोविड हॉस्पिटल (Corona Hospital) तसेच दहिवडी, म्हसवड येथील तीनशेहून अधिक बेड्स आणि कोरोना उपचार केंद्रांच्या माध्यमातून निस्वार्थीपणे हजारो कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यासाठी त्यांनी खूप मोठी व्यवस्था उभी केली आहे. विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी त्यांचे जनतेसाठी सकारात्मक काम सुरुच आहे. कोरोना काळातील त्यांच्या रुग्णसेवेला इश्वराचे पाठबळ आहे, असे मत माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केले. (MLA Gore's work will continue selflessly even if the opposition makes a fuss says Devendra fadanvis)
 
आमदार जयकुमार यांच्या प्रयत्नाने म्हसवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, माणगंगा शैक्षणिक संस्था संचलित येथील हरिभाऊ मंगल कार्यालयात मोफत जनसेवा कोविड उपचार केंद्राचा ऑनलाईन प्रारंभ आज केला. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंद आफळे, सहकार्यवाहक समीर सोनी, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा : उजनीच्या पाणीप्रश्नात जयंत पाटलांनी लक्ष घातले; सिंचन भवनाकडे सोलापूर जिल्ह्याचे डोळे

श्री.फडणवीस म्हणाले, येणारे सहा महिने राज्यासाठी महत्वाचे आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जनतेने लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून महिन्याला 29 कोटी डोस प्रतिमहिना उपलब्ध होणार आहेत. केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिवर इंजेक्शन आणि 1750 टन ऑक्सिजन दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आवश्य वाचा : अन् दोनच दिवसांत कंगना म्हणाली, मी इन्स्टाग्रामवर आठवडाभरही टिकणार नाही!

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, "मायणी मेडिकल कॉलेज आज हजारो रुग्णांचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका निभावत आहे. मतदारसंघात रुग्णांवर उपचार करताना काही कमतरता जाणवली तर शासकीय अधिकाऱ्यांना आ. जयकुमार गोरेंचीच मदत होत आहे. आम्ही फलटण येथेही कोरोना उपचार केंद्र सुरु करत आहोत. या भागातील रस्त्यांसाठी बाराशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे मायणी मेडिकल कॉलेज,तेथील पाचशे बेडचे हॉस्पिटल आज सुरु आहे. आजपर्यंत आम्ही 3500 पेक्षा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन कोरोना विरूध्दची लढाई समर्थपणे लढत आहे. म्हसवडच्या कोरोना उपचार केंद्रात शंभर बेड्सच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉलर. वसंतराव मासाळ यांनी मानले. 

यावेळी घनश्याम व अभिजित केसकर, जिल्हा. परिषद सदस्य अरुण गोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, विलासराव माने, माण तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर, डॉ.सागर खाडे, डॉ. बाळकृष्ण शेटे, डॉ. अनिता खरात, माजी सरपंच रामचंद्र नरळे, नितीन दोशी, नगरसेवक अकिल काझी, लुनेश विरकर, डॉ.वसंत मासाळ, म्हसवड पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

औषधांसाठी 45 लाखांचा निधी 
कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी 45 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. म्हसवड केंद्रात रुग्णांच्या जेवण, नाष्ट्याची सोय केली आहे. शासनाकडून मिळाली तर ठिक, नाहीतर रेमडेसिवीर इंजेक्षन्स मूळ किमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आम्हाला खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची मोठी मदत होत असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख