पिंपरी : कोर्ट मॅनेज करून खटल्याचा निकाल मनासारखा लावून देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनीटने तळेगाव दाभाडे (ता.मावळ) येथे काल पकडले. तिला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.
दरम्यान, कोर्टातही दलाल घुसल्याचे गंभीर प्रकरण यानिमित्ताने समोर आले आहे शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता,.मावळ) असे या लाच घेतलेल्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. मात्र, तिने कोणासाठी ही लाच घेतली तसेच ती कोणाकरिता काम करीत होती. याची नीट चौकशी तिच्याकडून झाली, तर मोठी खळबळजनक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केलेल्यांलविरुद्ध एक खटला वडगाव मावळ कोर्टात प्रलंबित आहे. त्याचा निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी व त्याकरिता कोर्ट मॅनेज करून देते, असे सांगून त्यांच्याकडून शुभावरीने अडीच लाख रुपयांची मागणी करून ते काल घेतले होते. एसीबीच्या उपअधिक्षक सीमा मेहेंदळे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

