माथाडींचा कामगार दिन रेल्वे स्थानकांबाहेर; अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वेधले मागण्यांकडे लक्ष - Mathadi's Labor Day outside railway stations; Pay attention to the demands made by the officials | Politics Marathi News - Sarkarnama

माथाडींचा कामगार दिन रेल्वे स्थानकांबाहेर; अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वेधले मागण्यांकडे लक्ष

राजेश पाटील 
शनिवार, 1 मे 2021

माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी पॅकेज जाहीर करावे. कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्यांना रेल्वे व बसमधून प्रवासाला परवानगी द्यावी. तसेच त्यांना विमा संरक्षणाबरोबरच मृताच्या कुटुंबियांना मदत मिळावी, आदी मागण्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शासनासमोर ठेवून विविध आंदोलनाव्दारे त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

ढेबेवाडी : बाजार समित्या व अन्य ठिकाणी जीवनावश्यक मालाच्या चढ-उताराचे काम करणा-या माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना प्रवासाच्या परवानगीसह विमा संरक्षण द्यावे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी आज नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिसरातील विविध रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कामगार दिन साजरा केला.

कोरोना संसर्गाच्या काळात गेल्यावर्षी आणि आत्तासुद्धा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी माथाडी कामगारांसह संलग्न अन्य घटक जीवावर उदार होऊन सेवा बजावत आहेत. मुंबई बाजार समितीच्या आवारात अन्न-धान्य, कांदा, बटाटा, मसाले, भाजी, फळे, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक मालाची तसेच जनावरांचे खाद्य व खतांच्या चढ-उताराची कामे सुरू आहेत.

ही सेवा बजावताना अनेक माथाडी कामगारांना कोरोनाची लागण झाली. काहींचा त्यामध्ये मृत्यूही झाला. अजूनही ही मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी पॅकेज जाहीर करावे. कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्यांना रेल्वे व बसमधून प्रवासाला परवानगी द्यावी. तसेच त्यांना विमा संरक्षणाबरोबरच मृताच्या कुटुंबियांना मदत मिळावी, आदी मागण्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शासनासमोर ठेवून विविध आंदोलनाव्दारे त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी मुंबईत मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या मस्जिद बंदर, डॉकयार्ड रोड, रे रोड, कुर्ला, मानखुर्द, वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दादर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, डहाणू आदी रेल्वे स्थानकाबाहेर कोरोनाची नियमावली आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत स्थानक प्रबंधकांना निवेदन सादर करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख