मराठा विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ न मिळाल्याने मंत्रालयाचा सहावा मजला हलला... - As the Maratha students did not get the benefit of EWS, the sixth floor of the Ministry was moved ... | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा विद्यार्थ्यांना ईडब्लूएसचा लाभ न मिळाल्याने मंत्रालयाचा सहावा मजला हलला...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका निश्चित झाल्यानंतर आणि सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केल्यानंतरही एसईबीसी प्रवर्गातील नोकर भरतीचे उमेदवार व शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबत दिरंगाई का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. 

मुंबई : एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्य सचिवांनी आज सर्व विभागांना खरमरीत पत्र पाठवून याबाबतचा अनुपालन अहवाल मागवला आहे. 

मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी याबाबत चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मंगळवारी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत चव्हाण यांनी या प्रकाराबद्दल असंतोष व्यक्त केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका निश्चित झाल्यानंतर आणि सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केल्यानंतरही एसईबीसी प्रवर्गातील नोकर भरतीचे उमेदवार व शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबत दिरंगाई का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. 

मंगळवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्याही निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवारी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून शासनाच्या सदरहू निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत दर सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना अहवाल पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख