फडणवीस यांच्या बुटावर लक्ष देऊ नका : मलिक यांना सल्ला - Malik should take coaching classes to improve the language style of leaders .... | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांच्या बुटावर लक्ष देऊ नका : मलिक यांना सल्ला

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 22 मे 2021

मलिक यांनी लहान सहान गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी आपदग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासारख्या महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असेही श्रीमती देसाई यांनी सुनावले आहे.

मुंबई : चिखलात, काट्याकुट्यात फिरणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या (opposition Leaders) पादत्राणांचा ब्रँड पाहण्याऐवजी, श्रद्धांजली सभेत सुस्वागतम असे म्हणणाऱ्या आपल्या सहकारी पक्षाच्या अतिवरिष्ठ तरुण नेत्यांची भाषाशैली, मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांनी सुधारावी, असा टोला भाजप (BJP) महिला मोर्चाच्या मुंबई (Mumbai) अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal Desai) यांनी मलिक यांना लगावला आहे. (Malik should take coaching classes to improve the language style of leaders)

चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षतेने प्रवीण दरेकर गेले होते. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या एकसारख्या नवीन बुटांवरून मलिक यांनी खोचक कॉमेंट केली होती, त्याला श्रीमती देसाई यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : नितीन गडकरींनी आमदार क्षीरसागरांच्या मागणीची घेतली दखल..पत्रही पाठविले

बुटांवर लक्ष देण्याऐवजी आपदग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यावर लक्ष द्या, असेही त्यांनी मलिक यांना सुनावले आहे. नुकतेच महाराष्ट्रातील एका तरुण खासदाराच्या निधनानंतर श्रद्धांजली सभेत बोलताना मलिक यांच्या सहकारी पक्षाच्या तरुण अतिवरिष्ठ नेत्याने, मी जमलेल्या सर्वांचे स्वागत करतो, असे उद्गार काढल्याची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध झाली होती. या वाक्यात चुकीचे काही नसले तरी भारतीय प्रथा-परंपरा व रितीरिवाजानुसार दुःखाच्या प्रसंगात आनंद-उत्साहदर्शक शब्द-वाक्य उच्चारणे त्याज्य मानले जाते. 

आवश्य वाचा : संचारबंदीत घराबाहेर भाजी विकणाऱ्या मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू; दोन पोलीस निलंबित

पण मुख्यतः इटालियन-युरोपीय परंपरा कोळून प्यायलेल्या व्यक्तींना भारतीय परंपरांची धड माहितीही नसते. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांच्या पेहेरावाची उठाठेव करण्यापेक्षा अशा नेत्यांची भाषाशैली सुधारण्यासाठी मलिक यांनी कोचिंग क्लास घ्यावेत. आपण मंत्री असलेल्या कौशल्य विकास विभागातर्फेही या अतिवरिष्ठ नेत्यासाठी असे स्पेशल कोचिंग क्लास घेता येतील, अशा शब्दांत श्रीमती देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. 

परदेशातून आल्याने भारतीय प्रथा-परंपरा, नावे, इतिहास-भूगोल यांची माहिती नसलेल्या अशाच उत्साही नेत्यांनी चुकीचे शब्दोच्चार, चुकीच्या कृती केल्याचे किस्से यापूर्वीही घडले आहेत. असेच विचार असलेल्या नेत्यांच्या कृतीतूनही असाच गोंधळ होऊन त्याचा फटका जनतेला बसण्याची शक्यता असते. त्यामुळे मलिक यांनी लहान सहान गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी आपदग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासारख्या महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असेही श्रीमती देसाई यांनी सुनावले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख