पुण्याप्रमाणे साताऱ्यातही टोलमाफी करा; बोगस पावत्या देणाऱ्यांचा शोध घ्या..... - Make toll waiver in Satara like Pune: Shashikant Shinde's demand in the convention | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याप्रमाणे साताऱ्यातही टोलमाफी करा; बोगस पावत्या देणाऱ्यांचा शोध घ्या.....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

खेड शिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावर बोगस पावतीव्दारे भ्रष्टाचार होत आहे. या बोगस पावत्यांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून पैसे उकळणाऱ्या टोळीच्या मुख्यसूत्रधाराचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली. त्यावर सभापती रामराजेंनी प्रशासनाने उचित कारवाई करावी, असे आदेश दिले.

सातारा : पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० वाहनांना टोलमाफ करावा, तसेच खेड-शिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावरील बोगस पावती घेऊन भ्रष्टाचार केला जात आहे, त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केली. 

विधान परिषदेत आज आमदार शशिकांत शिंदे यांनी टोलमाफी, आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर बोगस पावत्यांव्दारे वाहनचालकांची होणारी लूटीचा मुद्दा उपस्थित केला. आमदार शिंदे म्हणाले, पुणे बंगळूर महामार्गचे सहापदरीकरणाचे काम रिलायन्स कंपनीकडे होते. पण दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी कंपनीला शासनाने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी या मार्गावर टोल  का द्यावा, असा प्रश्न उपस्थित करून स्थानिकांना टोलमाफी करावी, अशी मागणी होत आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० वाहनांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर टोलामाफी करावी.

तसेच खेड शिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावर बोगस पावतीव्दारे भ्रष्टाचार होत आहे. या बोगस पावत्यांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून पैसे उकळणाऱ्या टोळीच्या मुख्यसूत्रधाराचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली. त्यावर सभापती रामराजेंनी प्रशासनाने उचित कारवाई करावी, असे आदेश दिले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख