महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंबड्यांची झुंज; तर जनतेची जगण्याच्या प्रश्नांशी झुंज - Mahavikas Aghadi leaders' hen struggle; So the masses struggle with the question of survival | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंबड्यांची झुंज; तर जनतेची जगण्याच्या प्रश्नांशी झुंज

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

तीनही पक्ष जनतेच्या प्रश्नांबाबत किती बेफिकीर आहेत हेच यातून दिसते. जनतेच्या हालांकडे लक्ष न देता महावसुली सरकारमधील मुख्यमंत्र्यांसकट सर्व नेते स्वार्थात मशगूल आहेत

मुंबई : कोविडची दुसरी लाट, बेरोजगारी, पावसाने दिलेली ओढ आदींशी राज्यातील जनता झुंजत असताना महावसुली सरकारमधील तीनही सहकारी पक्षांमध्ये कोंबड्यांची झुंज सुरु आहे. जनता होरपळत असताना सरकारमधील हे तिघेही पक्ष स्वार्थात मशगुल असल्याची टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. Mahavikas Aghadi leaders' hen struggle; So the masses struggle with the question of survival

महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी नेते विधानसभाध्यक्ष पदावरून वाद घालत आहेत, दुसरीकडे हे नेते स्वबळाची भाषाही करीत आहेत व त्याचवेळी अन्य सहकारी पक्षांवर कुरघोडीचाही प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात भातखळकर यांनी हे भाष्य  केले आहे. 

हेही वाचा : आयुक्तांचा जोर का धक्का...मलईदार पोस्टवरील 44 अधिकाऱ्यांची उचलबांगडी

एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाची भाषा करीत आहेत, आपले फोन टॅप होत असल्याची शंका व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे पटोले हे लहान व्यक्ती असल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आपण प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणत आहेत.तिसरीकडे शिवसेनेला स्वबळाची चिंता आहे, हे सर्व किळसवाणे राजकारण सुरु असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. 

आवश्य वाचा : विरोधी पक्षनेते अडचणीत; अंगरक्षकाच्या संशयास्पद मृत्यूचा सीआयडी लावणार छडा

राज्य अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळते आहे, तरुणांना रोजगार नसल्याने ते वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारत आहेत. पाऊस नसल्याने पिके जळत आहेत तरीही महावसुली सरकारमधील तिघाही पक्षांना विधानसभाध्यक्ष कोण होणार, कोणता पक्ष किती मोठा होणार याचीच चिंता लागली आहे.

हे तीनही पक्ष जनतेच्या प्रश्नांबाबत किती बेफिकीर आहेत हेच यातून दिसते. जनतेच्या हालांकडे लक्ष न देता महावसुली सरकारमधील मुख्यमंत्र्यांसकट सर्व नेते स्वार्थात मशगूल आहेत हे संतापजनक आहे, अशा शब्दांत भातखळकर यांनी या तीनही पक्षांचा समाचार घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख