महाबळेश्वरात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा; अजित पवारांनी दिले ३३.५० कोटी - Mahabaleshwar will have international standard facilities; Ajit Pawar gave Rs 33.50 crore | Politics Marathi News - Sarkarnama

महाबळेश्वरात मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा; अजित पवारांनी दिले ३३.५० कोटी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील 'मॉल रोड'च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभिकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे केली जाणार आहेत. तसेच शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.

सातारा : महाबळेश्वरचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती करण्यासाठी तब्बल ३३ कोटी ५० लाख रूपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मंजूर केला आहे. ही विकास कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिला. यामुळे महाबळेश्वरचे सौंदर्य अधिक खुलेल आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास ही श्री. पवार यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीस पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

या निधीतून महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील 'मॉल रोड'च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभिकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे केली जाणार आहेत. तसेच शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.

महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची 'मॉल रोड'च्या धर्तीवर सुधारणा करताना हे रस्ते रुंद करण्यात येतील. त्यांची रंगसंगती आणि नामफलक एकाच पद्धतीचे असतील. वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्यात येतील. पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात येईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेस दिव्यांची  आकर्षक रोषणाई करण्यात येईल.  

शहरातील ऐतिहासिक पेटीट लायब्ररीचे नूतनीकरण करण्यात येईल, यासंदर्भात करावयाच्या विविध विकासकामांचे सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मकरंद पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख