महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनिल अंबानींचे इव्हिनिंग वॉक केले बंद

लॉकडाउनमध्ये संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही उदयोगपती हे नियमित वॉक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना मिळाली.त्यांनी तातडीने या बाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली.
महाबळेश्वरच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनिल अंबानींचे इव्हिनिंग वॉक केले बंद
Mahabaleshwar palika Co closes Anil Ambani's evening walk

महाबळेश्वर : प्रसिध्द उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिनासह ज्या मैदानावर इव्हिनिंग वॉक घेत होते. त्या मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला पालिकेने नोटीस बजावुन दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेने नोटीस बजावल्यामुळे दि क्लब ने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहे. आता या मैदानावर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे इव्हिनिंग वॉक घेणारे उदयोगपती अनिल अंबानी यांच्यासह द क्लब च्या गोल्फ मैदानावर अनेकांचे इव्हिनिंग वॉकिंग बंद झाले आहे. 

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. येथील थंड हवा आणि निसर्ग पाहण्यासाठी देशातील अनेक नामवंत हे नेहमी आपल्या कुटूंबा बरोबर येथे वरचेवर येत असतात. उदयोग विश्वात ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे असे अंबानी बंधु हे देखील आपल्या कुटुंबाबरोबर नेहमी महाबळेश्वरला भेट देतात. मुकेश अंबानी यांचे देखील महाबळेश्वरवर प्रेम आहे. त्यांनी आपल्या मुलीचा साखरपुडयाचा कौटुंबिक सोहळा येथेच आयोजित केला होता.

मुकेश अंबानी प्रमाणे त्यांचे बंधु अनिल अंबानी हे देखील नेहमी कुटुंबासह महाबळेश्वरला नेहमी येत असतात. सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याच काळात अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह महाबळेश्वर येथे आले आहेत. ते सध्या देशातील डायमंड किंग म्हणुन प्रसिध्द असलेले उदयोगपती अनुम मेहता यांच्या लाल बंगल्यात मुक्कामी आहेत. गेली अनेक दिवस येथे मुक्कामी असलेले उदयोगपती अनिल अंबानी यांना रोज सकाळ आणि संध्याकाळी वॉकसाठी बाहेर पडण्याची सवय आहे. मुंबई असो वा महाबळेश्वर ते वॉक कधीच चुकवित नाहीत. 

वॉकची सवय असलेले अनिल अंबानी हे रोज सायंकाळी आपली पत्नी टिना अंबानीसह येथील गोल्फ मैदानावर वॉक घेण्यासाठी येतात. याच ठिकाणी गावातील काही मोजकी मंडळी देखील वॉकसाठी नियमित येत असतात. सध्या या मैदानावर अनिल अंबानी हे आपल्या पत्नीसह रोज वॉक साठी येतात याची खबर शहरात पसरली. त्यामुळे वॉकसाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती त्यांनी आपली रोजची जागा बदलुन येथील गोल्फ मैदानावर वॉक सुरू केला. त्यामुळे हळुहळु या मैदानावर वॉकसाठी नागरीकांची गर्दी होऊ लागली. 

लॉकडाउनमध्ये संचारबंदी असुन कोणालाही बाहेर पडता येत नाही असे नियम असतानाही उदयोगपती हे नियमित वॉक घेण्यासाठी गोल्फ मैदानावर येतात ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना मिळाली. त्यांनी तातडीने या बाबत खात्री करून घेवुन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या दि क्लब या संस्थेच्या सचिवांना नोटीस काढली. या नोटीसीमध्ये मुख्याधिकारी यांनी म्हटले की, सध्या लॉकडाउन नियामांतर्गत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

असे असताना आपल्या मालकीच्या गोल्फ मैदानावर शहरातील अनेक नागरीक इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत. ही नोटीस प्राप्त होताच तातडीने गोल्फ मैदान वॉकींगसाठी बंद करण्यात यावे. या ठिकाणी वॉकींगसाठी नागरीकांना मनाई करण्यात यावी. अन्यथा आपल्या विरूध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, भा द वि कलम 188 तसेच भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा सुचना केल्या. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in