लोक असेच बेफिकीर राहिले तर राज्यात पुन्हा लॉकडाउन : मंत्री वडेट्टीवारांचा इशारा - Lockdown in the state again if people remain unconcerned: Minister Vadettivar's warning | Politics Marathi News - Sarkarnama

लोक असेच बेफिकीर राहिले तर राज्यात पुन्हा लॉकडाउन : मंत्री वडेट्टीवारांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

साधारणत: सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. या नंतरही लोकांनी काळजी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाउन करावे लागेल. त्या शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

नागपूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतचे स्पष्ट संकेत दिले. या शिवाय लोकांनी ऐकले नाही तर प्रसंगी लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.  

कितीही सांगितले तरी लोक मास्क न घालता फिरत आहेत. बेफिकीरीने वागत आहेत. अशा परिस्थितीत काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरने हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. लोकांनी काळजी घेतली नाही तर परत एकदा गरज पडली तर नाईट कर्फ्यू लावण्यात येईल.

साधारणत: सायंकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. या नंतरही लोकांनी काळजी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाउन करावे लागेल. त्या शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. संपूर्ण राज्यभर एकदमच नाईट कर्फ्यू लावण्यात येणार नाही. या संबंधीचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. स्थानिक परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
 
प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांबाबत तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा, येणारे अधिवेशन किती कालावधीचे असावे या संबंधी पुढील आठवड्यात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करणे सुरू आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधून माहिती घेऊ. आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांशी बोलून मदतीबाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

आधी "त्या' यादीवर स्वाक्षरी करावी
अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे याबाबतीत भेद करीत नाही. परंतु या संदर्भात अधिक कडक नियमावली कशी करता येईल, या बाबत बैठक घेण्यात येईल. वैधानिक मंडळाच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु वैधानिक मंडळांवर नेमावयाच्या नावांच्या यादीवर राज्यपाल स्वाक्षरी करतील की नाही, या बाबत शंका आहे. कारण त्यांनी अजून विधान परिषदेवर नेमावयाच्या सदस्यांच्या यादीवरच स्वाक्षरी केलेली नाही. पहिले त्यांनी त्यावर स्वाक्षरी करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

 

राजकारण्यांनी गर्दी टाळावी

सर्वच पक्षाचे लोक आता आंदोलन करीत आहेत. वीजेसाठी भाजपा तर इंधन दरवाढीसाठी सत्ताधारी आंदोलने करीत आहेत. पण, कोरोनाची परिस्थिती पाहाता सर्वच पक्षांनी यापासून दूर राहावे आणि राजकीय नेत्यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन वडेट्टीवारांनी केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख