'जरंडेश्वर'ला नियमानुसारच कर्ज पुरवठा; ईडीला सर्व माहिती दिली जाणार 

बँकेच्या संचालक मंडळाने कारखान्यास आधुनिकीकरण व गाळप क्षमता वाढ व सहवीज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी मध्यम मुदत कर्ज २५.८८ कोटी व २४.७२ कोटी, २७.६० कोटी असे एकूण मध्यम मुदत कर्ज ७७.६० कोटी मंजूर केले आहे.
 'जरंडेश्वर'ला नियमानुसारच कर्ज पुरवठा; ईडीला सर्व माहिती दिली जाणार 
Loan supply to Jarandeshwar as per rules; All information will be given to the ED

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्यास जिल्हा बँकेने केलेले कर्ज वाटप हे नियमानुसार व रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या धोरणानुसारच केले आहे. कारखान्याच्या जप्ती व लिलाव प्रक्रियेविरुध्दची बाब न्यायप्रविष्ठ झाल्याने राज्य बँकेची चौकशी करताना त्या कारखान्यास कर्ज रुपाने मंजूर झालेल्या व वितरीत झालेल्या रक्कमांची माहिती मिळण्यासाठी सक्त वसूली संचालनालयाने जिल्हा बँकेकडून माहिती मागविली आहे. जिल्हा बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून, उच्च यंत्रणेकडून माहिती मागविणे हा नियमित कामकाजाचा भाग आहे. ही माहिती आम्ही ईडीला देणार आहोत, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. 

जरंडेश्वर कारखान्याला दिलेल्या कर्जप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने नोटीस पाठवून जिल्हा बॅंकेकडून माहिती मागवली आहे. याविषयीची माहिती डॉ. सरकाळे यांनी पत्रकातून दिली आहे. त्यांनी म्हटले की, जरंडेश्वर कारखाना व्यवस्थापनाने २०१६-१७ मध्ये सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, मशिनरी आधुनिकीकरण, गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरुन सात हजार मेट्रिक टन करण्यासाठी पुणे जिल्हा बँकेकडे सहभाग कर्ज योजनेतून २४६.८५ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करुन कर्ज पुरवठा करण्याची विनंती केली होती.

हा कारखाना सातारा जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पुणे जिल्हा बँकेने कर्ज पुरवठ्याच्या अनुषंगाने सातारा जिल्हा बँकेस प्रस्ताव दिला. या प्रस्तावानुसार कारखान्याची कार्यक्षमता, परतफेड क्षमता, गाळप, मुल्यांकन, प्रकल्प खर्च, विस्तारीकरणामुळे वाढणारी आर्थिक सक्षमता, सक्षम तारण व बँकेचे धोरणास अनुसरुन बँकेच्या संचालक मंडळाने कारखान्यास आधुनिकीकरण व गाळप क्षमता वाढ व सहवीज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी मध्यम मुदत कर्ज २५.८८ कोटी व २४.७२ कोटी, २७.६० कोटी असे एकूण मध्यम मुदत कर्ज ७७.६० कोटी मंजूर केले आहे.

हे मंजूर कर्ज २०१६-१७ पासून टप्प्याटप्याने वितरीत केले. कारखान्याची परतफेड क्षमता वाढल्याने कारखान्याने बँकेच्या कर्जावरील दरमहाचे व्याज व वसूलीस पात्र सर्व हप्त्याची लिड बँकेमार्फत नियमित परतफेड केलेली आहे. दुस-या टप्यात कारखान्याने २०२०-२१ मध्ये आणखी विस्तार करताना गाळप क्षमता सात हजारांवरुन १२ हजार मेट्रीक टन केली. तसेच सहवीज निर्मिती ३२ मेगावॅटवरुन ५० मेगावॅट आणि इथेनॉल निर्मिती ८० केएलपीडीवरुन २०० केएलपीडी करण्यासाठी बँकेकडे एकत्रित रक्कम ६० कोटी तसेच साखर साठयावर १०० कोटींचे कर्ज मागणी प्रस्ताव लिड बँकेमार्फत दिला.

त्याची छाननी करुन बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने विस्तारवाढ करीता ६० कोटी आणि साखर तारण ठेऊन १०० कोटी असे एकूण १६० कोटी कारखान्यास मंजूर केले आहे. कारखान्यास बँकेच्या धोरणानुसार २०१६-१७ पासून एकूण २३७.६० कोटींचे कर्ज लिड बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेमार्फत दिले आहे. आजअखेर कारखान्यास मंजूर केलेल्या एकूण २३७.६० कोटींपैकी १२९.९८ कोटी कर्ज वाटप केले असून, ३१.६० कोटी वसूल झाले आहे. आजअखेर ९७.३८ कोटी नियमित येणेबाकी आहे, असेही त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. 

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in