'म्युकर'वरच्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द होणार..... - The list of 131 hospitals on 'Mucker' will be published ..... | Politics Marathi News - Sarkarnama

'म्युकर'वरच्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द होणार.....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 25 मे 2021

म्युकरमायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकरमायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची (Corona Pandemic) साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देताना संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर भर द्यावा. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (Mahatma Jotiba Phule Jan arogya Yojana) म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजूरी देत राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली.
 
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांची आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिश चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सभाष साळुंखे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते. 

हेही वाचा : करेक्ट कार्यक्रम? : `शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे फडणवीस यांना बंद खोलीत भेटले..

श्री. पवार म्हणाले, राज्यातील शहरी भागातील कोरोना संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा वर्कर्सना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात. ग्रामदक्षता समित्यांना अधिक क्षमतेने कार्यान्वित करावे.

आवश्य वाचा :  PNB गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता..

कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे. म्युकरमायकोसिसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरु केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरु करण्यात यावेत, त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही.

म्युकरमायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकरमायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे, त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल.

मात्र रेमडेसिवर प्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी. तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणुक करावी, त्यामाध्यमातून प्रत्येक रुग्णांच्या बिलाची तपासणी
करण्यात यावी. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख