केंद्र सरकारची हुकूमशाही मोडीत काढू : पृथ्वीराज चव्हाण - Let's break the central government's dictatorship says Congress Leader Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्र सरकारची हुकूमशाही मोडीत काढू : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

चव्हाण म्हणाले, "केंद्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली आरोग्य  विभागासाठी १३२ टक्के दाखवलेली वाढ बोगस आहे. त्यासाठी शिक्षण खर्च सुद्धा ८ टक्‍क्‍याने कमी केला आहे. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात चालला आहे.

निमसोड : डिझेल, पेट्रोल, गॅसची दररोज होणारी भरमसाट वाढ, महागाईचा उंच्चाक, चुकीचे शेतकरी धोरण व ढासळलेली अर्थव्यवस्था हे सर्व केंद्र सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा परिपाक आहे. जनतेच्या मदतीतून ही हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिला.

येळीव (ता. खटाव) येथे हरणाई सहकारी सूतगिरणीत संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा सत्कार व खटाव तालुक्‍यातील शिक्षक मतदारांशी हितगुज असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अशोक गोडसे, राजेंद्र शेलार, अधिकराव चिखलीकर, इंद्रजित चव्हाण, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, "केंद्र सरकारने कोरोनाच्या नावाखाली आरोग्य  विभागासाठी १३२ टक्के दाखवलेली वाढ बोगस आहे. त्यासाठी शिक्षण खर्च सुद्धा ८ टक्‍क्‍याने कमी केला आहे. चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात चालला आहे. 12 कोटी लोकांचा कोरोनामुळे रोजगार गेला आहे. प्रत्येक देशात अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सरकार व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी तेथील सरकार काही टक्के अनुदान देत आहे.

या उलट भारतात 27 रुपये उत्पादन खर्चावर 70 रुपये कर लावत आहे. भरमसाट इंधन दरवाढ व शेतकरी आंदोलन यामुळे जनतेतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.'' कोरोनाची दुसरी लाट पुन्हा डोक वर काढत आहे. खबरदारी घ्या अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्‍यता नाकरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

आमदार आसगांवकर म्हणाले, "महाविकास आघाडीने सहापैकी पाच जागा जिंकून यापुढील काळातील विजयाची लिटमस टेस्ट जिंकून पुणे पदवीधर- शिक्षक आमदारांची भाजपची मक्‍तेदारी मोडीत काढली आहे.'' शिक्षणमंत्र्यांची वर्षातून एकदा प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक व संस्था चालकांसाठी आढाव बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

रणजितसिंह देशमुख म्हणाले, "खटाव- माण तालुक्‍यांतील सर्व माजी आमदारांच्या पाठपुराव्यामुळे व आम्ही केलेल्या आंदोलनामुळेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच उरमोडीचे पाणी व पृथ्वी बंधाऱ्याचे काम झाले आहे. मात्र, खोटा बुरखा पांघरलेले एकटेच श्रेय घेताना ढोल बजावत आहेत.'' या वेळी प्रभाकर घार्गे, डॉ. सुरेश जाधव, सुरेंद्र गुदगे, संजीव साळुंखे यांची भाषणे झाली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख