देवरूखवाडी- कोंढावळेत डोंगरकडा कोसळून आठ घरे गाडली; मायलेकींचा दुर्दैवी अंत 

आकस्मिक घडलेल्या या आपत्तीत गोठ्यातील जनावरांना वाचविणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ही दुर्घटना सायंकाळच्या सुमारास घडली असल्याने मोठी जीवितहानी टळली.
देवरूखवाडी- कोंढावळेत डोंगरकडा कोसळून आठ घरे गाडली; मायलेकींचा दुर्दैवी अंत 
Landslide in Devrukhwadi-Kondhaval, buried eight to ten houses-ub73

वाई : मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील देवरूखवाडी येथील घरांवर सायंकाळी डोंगरकडयाचा भाग कोसळून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आठ ते दहा घरे गाडली गेली. यातील एका घरात अडकून राहिबाई मारुती कोंढाळकर (वय ८०) व त्यांची मुलगी भीमाबाई सखाराम वाशिवले (वय ६२) या मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच दोन जण जखमी झाले असून आनंदा गुणाजी कोंढाळकर यांची म्हैस व रेडूक तर भगवान हरिबा कोंढाळकर यांच्या दोन म्हैशी व तीन रेडके या घटनेत जागीच मृत झाली. 
बुधवार (दि.२१) पासून वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.  Landslide in Devrukhwadi-Kondhaval, buried eight to ten houses-ub73

धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पावसाचा प्रदेश असलेल्या जांभळी व जोर खोऱ्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे जांभळी खोऱ्यातील कमळगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवरुखवाडी या १७-१८ घरांच्या वाडीवर काळाने घाला घातला. सायंकाळच्या सुमारास कडा कोसळतोय, असे लक्षात येताच काहींनी हाका मारून, आरडाओरडा करून लोकांना घराबाहेर काढण्याचे प्रयत्न केले. 

मात्र, वयस्कर असलेल्या राहिबाई व त्यांची मुलगी भीमाबाई दरवाजाला आतून कडी लावून घरात बसल्याने त्यांना हाका ऐकू गेल्या नाहीत. त्यामुळे घरातच अडकून राहिल्याने त्यांचा जीव वाचवता आला नाही. या घटनेत २५ जण घराबाहेर पडल्याने बचावले. आकस्मिक घडलेल्या या आपत्तीत गोठ्यातील जनावरांना वाचविणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहा जनावरे मृत्युमुखी पडली. ही दुर्घटना सायंकाळच्या सुमारास घडली असल्याने मोठी जीवितहानी टळली. 

या घटनेची माहिती कळताच आमदार मकरंद पाटील यांनी रात्री नऊ वाजताच तहसिलदार, पोलीस पथके, गट विकास अधिकारी यांच्यासह तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि बचाव तसेच मदत कार्यास सुरुवात केली.  आमदार पाटील आणि प्रशासनाने रात्रीच घरातील व्यक्तींना प्राथमिक शाळा इमारतीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली होती. त्या ठिकाणी ग्रामस्थांना हलविण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास आमदार पाटील पुन्हा घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या राहिबाई व भीमाबाई यांचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी वाई येथे पाठविण्यात आले.

माळीण (जि. पुणे) येथील दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या दुर्घटनेनंतर परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.दरम्यान मृत राहीबाई व भीमाबाई यांच्या मृतदेहांचे वाई येथे शवविच्छेदन करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. देवरूखवाडी हे गाव कमळगडाच्या पायथ्याजवळ उतारावर वसले आहे. या भागात मोबाईल नेटवर्क अभावाने मिळते. मात्र गुरुवारी रात्री दुर्घटनेबाबत कळताच आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. आणि स्वतःही दुर्घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचाव कार्यास सुरुवात केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in