कोरोना रूग्णांच्या हेळसांडीवरून जयकुमार गोरे आक्रमक, त्वरीत उपाय करा अन्यथा उद्रेक होणार - Jayakumar Gore aggressive, quick response plan from the care of corona patients otherwise there will be outbreak | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कोरोना रूग्णांच्या हेळसांडीवरून जयकुमार गोरे आक्रमक, त्वरीत उपाय करा अन्यथा उद्रेक होणार

विशाल गुंजवटे 
सोमवार, 19 एप्रिल 2021

जिल्ह्याचे अधिकारी सारखे फेसबुक लाइव्हद्वारे मोठी भाषणे झोडून जनतेवर निर्बंध लादत आहेत. ते गरजेचेही आहे. मात्र, हे करताना त्यांनी बाधित रुग्णांवर योग्य उपचार आणि योग्य सुविधा मिळतात की नाही, हे पाहणेही गरजेचे आहे. आवश्‍यक असणारा औषधसाठा व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्याऐवजी खालच्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर रोष झाडायचे काम केले जात आहे.

बिजवडी : दहिवडी येथील कोरोना केअर सेंटरमधील बाधित रुग्णांची सुविधांअभावी हेळसांड होत आहे. येथे अनागोंदी कारभार सुरू असून रुग्णांची हेळसांड खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत बाधितांचा जीव वाचला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना त्वरित केल्या नाहीत, तर उद्रेक होईल, असा इशारा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

दहिवडी (ता. माण) येथील कोरोना केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. गोरे म्हणाले, "दहिवडीतील शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या 38 रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा वैद्यकीय स्टाफ नाही. एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन नर्स रात्रं-दिवस काम करून रुग्णांवर उपचार करत आहेत.

बाधित रुग्णांना मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. बेड्‌सवर टाकायला बेडशिट्‌सही नाहीत. सर्वत्र अस्वच्छता आहे. योग्य सुविधा नसल्याने रुग्णांना येथे उपचाराचे तर सोडाच थांबणेही मुश्‍किल झाले आहे.'' ते म्हणाले, "दहिवडी सीसीसीमध्ये बाधित रुग्णांना सुविधा मिळत नसल्याबद्दल माहिती घेण्यासाठी प्रांत आणि तहसीलदारांना फोन केला तर ते संपर्कहिन आहेत.

जिल्ह्याचे अधिकारी सारखे फेसबुक लाइव्हद्वारे मोठी भाषणे झोडून जनतेवर निर्बंध लादत आहेत. ते गरजेचेही आहे. मात्र, हे करताना त्यांनी बाधित रुग्णांवर योग्य उपचार आणि योग्य सुविधा मिळतात की नाही, हे पाहणेही गरजेचे आहे. आवश्‍यक असणारा औषधसाठा व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्याऐवजी खालच्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर रोष झाडायचे काम केले जात आहे.

बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांवर अंमलबाजणी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.'' माण तालुक्‍यात अनागोंदी कारभार सुरू आहे. रुग्णांची हेळसांड मी खपवून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत बाधितांचा जीव वाचला पाहिजे, त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना त्वरित केल्या नाहीत, तर उद्रेक होईल, असा इशाराही गोरे यांनी दिला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख