एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलिस दलाला दोषी धरणे योग्य नाही..... - It is not right to blame the entire police force for an officer's mistake ..... | Politics Marathi News - Sarkarnama

एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलिस दलाला दोषी धरणे योग्य नाही.....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी संसदेत भाजपकडून होत आहे. यावर श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम विरोधकांना पहावत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून लोकमताचा पाठींबा या सरकारला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशी मागणी भाजपकडून होत आहे. यात
कोणतेही तथ्य नाही.

सातारा : महाराष्ट्राचे पोलिस दलात अनेक नावलौकिक मिळविलेले अधिकारी आहेत. एखादा अधिकार चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे म्हणणेही योग्य नाही. यापूढेही मुंबई पोलिस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील. ज्यांची चुक झाली असेल त्यांची चौकशी करून ती सिध्द झाली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी मंत्री देसाई आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणात स्फोटके असलेल्या गाडीचा तपास एटीएसचे अधिकारी करत होते. या प्रकरणाच्या अगदी जवळपर्यंत एटीएस पोहोचली होती.

महाराष्ट्र पोलिसांची ही चांगली यंत्रणा असताना आणि महाराष्ट्र पोलिसांचा जगभर नावलौकिक असताना त्यांच्यावर गैरविश्‍वास दाखवून बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास करा, असे म्हणायचे हा महाराष्ट्रात राहून येथील पोलिसांवर गैरविश्‍वास दाखविल्यासारखे आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर केली आहे. एनआयकडून तपास सुरू असल्याने एटीएसकडून केवळ दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, विरोधक काय म्हणतात त्यावरच सातत्याने प्रश्‍न विचारले जात असतील तर योग्य नाही. विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर टीकाच करत असतात. एखाद्या बाबींचा तपास करताना संबंधित यंत्रणेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून तपासात काय प्रगती झाली आहे हे बाहेर येत नाही. तोपर्यंत बाहेर केवळ वावड्या उठत असतात त्यावर बोलणे योग्य नाही. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी संसदेत भाजपकडून होत आहे. यावर श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम विरोधकांना पहावत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून लोकमताचा पाठींबा या सरकारला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशी मागणी भाजपकडून होत आहे. यात कोणतेही तथ्य नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, त्यांनाच विचारले तर बरे होईल. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

गृह खात्याचा सीडीआर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हा दाखल होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, या प्रश्नावर मी काहीही बोलू शकत नाही. गृह मंत्रालयाच्या समोर नेमकी परिस्थिती येईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. सध्या पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे. नावलौकिक असलेल्या मंबई पोलिसांची नाचक्की झाली असून ती भरून काढण्यासाठी काय केले जाईल, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे पोलिस दल मोठे आहे.

अनेक नावलौकिक मिळविलेले अधिकारी या दलात आहेत. एखादा अधिकार चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे म्हणणेही योग्य नाही. यापूढेही मुंबई पोलिस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील. ज्यांची चुक झाली असेल त्यांची चौकशी करून ती सिध्द झाली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे मुंबई पोलिसांतील सर्वांना जबाबदार धरणे योग्य नाही. 

वाझे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती होती. तरी त्यांनी या प्रकरणावर पांघरूण घातले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते काहीही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीला सरकार उत्तर देऊ शकत नाही. परमबीर सिंह यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मुद्द्यावर मंत्री देसाई यांनी हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही. तसेच तो माझ्या अखत्यारीतील विषय नाही. त्यामुळे याबाबत शासनस्तरावरील योग्य व्यक्तीला विचारा असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

 शशीकांत शिंदेंना शंभर कोटींची ऑफर भाजपकडून होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा शंभर कोटींचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही. पण सरकार शंभर टक्के स्थीर आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत बोलले आहेत. खासदार शरद पवार बोलले आहेत. तसेच बाळासाहेब थोरोत ही याविषयी बोलले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम बहुमतांच्या जोरावर ठामपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे भोसले व नरेंद्र पाटील यांनी जल्लोष करून भाजपचे सरकार येणार, असे सांगितले आहे. यावर
शंभूराज देसाईंनी याबाबत मला काहीही महिती नाही, असे सांगून प्रश्नाला बगल दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख