सातारच्या जम्बो हॉस्पिटलच्या खर्चाची चौकशी करा : आमदार गोरेंची अधिवेशनात मागणी - Investigate the cost of Satara Jumbo Hospital says MLA Jaykumar Gore | Politics Marathi News - Sarkarnama

सातारच्या जम्बो हॉस्पिटलच्या खर्चाची चौकशी करा : आमदार गोरेंची अधिवेशनात मागणी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

जनतेला स्वस्तात धान्य केंद्रामुळेच मिळत आहे. धान्य, कापूस याची खरेदीही केंद्राच्या मदतीने होत आहे. जीएसटीचा परतावाही प्रत्येक वर्षी राज्याला दिला जात आहे. असे असताना केंद्राने काहीच केलेले नाही, असे राज्यातील महाविकास आघाडीची नेते मंडळी सांगत आहेत. मग राज्याने काय केले हे पण जनतेला सांगणे आवश्यक आहे. 

सातारा : कोरोना काळात बहुतांशी योजना केंद्रानेच राबवल्या, मात्र, राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. जम्बो हॉस्पिटल उभारण्यात काही अधिकाऱ्यांनी मनमानी करून भ्रष्टाचार केला आहे. सातारा जिल्ह्यातील जम्बो हॉस्पिटलच्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली.

अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार गोरेंनी आपली भूमिका मांडली. आमदार गोरे म्हणाले, कोविड विरूध्द लढाई लढताना राज्याने केंद्राच्या बहुतांशी योजना राबविल्या आहेत. केंद्राने किती व्हेंटीलेटर्स आणि पीपीई किट दिले, राज्याने किती घेतले याची आकडेवारी जाहीर करावी. सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी लसही केंद्राकडूनच मिळत आहे.

तसेच जनतेला स्वस्तात धान्य केंद्रामुळेच मिळत आहे. धान्य, कापूस याची खरेदीही केंद्राच्या मदतीने होत आहे. जीएसटीचा परतावाही प्रत्येक वर्षी राज्याला दिला जात आहे. असे असताना केंद्राने काहीच केलेले नाही, असे राज्यातील महाविकास आघाडीची नेते मंडळी सांगत आहेत. मग राज्याने काय केले हे पण जनतेला सांगणे आवश्यक आहे. 

देशातील इतर राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना महाराष्ट्रात संसर्ग वाढत आहे. राज्य सरकारने चांगले नियोजन केल्याची टीमकी वाजविली जात असताना कोरोना वाढण्याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. कोरोना काळात वैद्यकिय क्षेत्राने केलेल्या कामाचे कौतूक झालेच पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही ठराविक अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून भ्रष्टाचर केला आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना जिल्हा रूग्णालय, शासकिय व खासगी हॉस्पिटलमध्ये बाधितांवर उपचार केले गेले. अगदी शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू केले. त्यामध्ये व्हेंटीलेटर, बेडस्‌, ऑक्सिजन प्लँट, आयसीयूवर किती खर्च झाला. रेमडीसेव्हरची इंजेक्शन व ऑक्सिजन सिलिंडर जादा दराने का खरेदी केली याची चौकशी करावी. जम्बो रूग्णालयाला नियोजन समितीतून निधी दिला. तसेच सामाजिक संस्थांनीही सीएसआरमधून निधी दिला. या निधीचे नेमके काय झाले याचा हिशोब द्यायला हवा, अशी मागणी आमदार गोरेंनी अधिवेशनात केली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख