शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढू......  - If Shivendra Singh Raje joins NCP, we will fight elections under his leadership says shashikant shinde | Politics Marathi News - Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढू...... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

शिवेंद्रसिंहराजे भडकण्याचे नेमके कारण काय होते, या प्रश्‍नावर त्यांनी मला सांगून संतापायचे का, असे स्पष्ट करून आमदार शिंदे म्हणाले, आमच्यात वैचारिक मतभेद नाही. आजही आम्ही एकत्र काम करत आहोत. आमचे भांडण जिल्हा परिषद, पंचायत समिती व सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी असणार आहे. सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनेल टाकणार आहे. 

सातारा : जिल्हा बॅंकेची निवडणूक पक्षविरहित होणार असून महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार आहोत, असे सांगून आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजेंसोबत माझे वैयक्तिक कोणतेही भांडण नाही, आमचे भांडण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सातारा पालिकेच्या निवडणूकीसाठी असेल. यावेळेस आम्ही पालिकेत स्वतंत्र्य पॅनेल टाकणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा पालिकेत मी आणि दीपक पवार पॅनेलचे नेतृत्व करू, शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असेल, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 

राष्ट्रवादीच्या जनता दरबारानंतर आमदार शिंदेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सगळे पक्ष एकत्र येऊन राजकारण विरहित निवडणूक होऊन जिल्हा बॅंक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथे पक्ष बाजूला ठेऊन आम्ही सर्वजण काम करणार आहोत. यावेळेस शंभूराज देसाईंना संधी मिळणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, आघाडीतील नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.

आघाडीच्या घटक पक्षात भाजप असणार का, यावर ते म्हणाले, जिल्हा बॅंकेसाठीच्या आघाडीत सर्व पक्ष बाजूला ठेऊन आम्ही एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करणार आहोत. शिवेंद्रसिंहराजेंसोबतच्या भांडणानंतर तुम्ही यु टर्न का घेतला, यावर ते म्हणाले, मी सातारा-जावळीतून लढावे, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मागील निवडणूकीत सांगितले होते. पण आता मी श्री. पवार यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्ष, संघटना बांधणीचे काम करत आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी मी आजपर्यंत कधीही टाळलेली नाही. मी कोरेगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहे. शिवेंद्रसिंहराजे भडकण्याचे नेमके कारण काय होते, या प्रश्‍नावर त्यांनी मला सांगून संतापायचे का, असे स्पष्ट करून आमदार शिंदे म्हणाले, आमच्यात वैचारिक मतभेद नाही. आजही आम्ही एकत्र काम करत आहोत. आमचे भांडण जिल्हा परिषद, पंचायत समिती व सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी असणार आहे. सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनेल टाकणार आहे. 

दीपक पवार म्हणतात की आमदार शिंदेंचा जावळीशी काहीही संबंध नाही ते कोरेगावचे आहेत. या प्रश्‍नावर आमदार शिंदे म्हणाले, दीपक पवार हे आमच्या पक्षातील सहकारी आहे. जावळी साताऱ्यात लढताना मी त्यांना विचारावे अशी त्यांची भावना असेल. पण मी दहा वर्षे जावळीचे नेतृत्व केलेले आहे. तेथील लोकांना बरोबर घेऊन मी काम केलेले आहे. त्यामुळे आमच्या दोघांचे एकच ध्येय असले पाहिजे. येथे आमच्या दोघांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महत्वाचा आहे. त्यामुळे एकत्रित काम केल्यास ते पक्षाच्या फायद्याचे ठरणार आहे. 

तुमचे कार्यक्षेत्र विस्तारत असताना राष्ट्रवादीतूनच तुम्हाला विरोध होतोय. याचे नेमके कारण काय, यावर ते म्हणाले, कोणाला काहीही वाटते हे महत्वाचे नाही. मी शरद पवारांचा पाईक आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणार आहे. मुंबईत काम करताना गणेश नाईकांशी चांगले संबंध होते, पण पक्ष आला की आम्ही विरोधात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा माझ्यावर विश्‍वास आहे, त्यामुळे माझ्याबद्दल कोण काय करतंय याकडे मी लक्ष देत नाही. 

संघर्षातून माणूl यशस्वी झाला पाहिजे. यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सातारा पालिका लढणार हे ऐकल्यावर आतापासून अनेक लोक कामाला लागले आहेत. जनता आमच्या सोबत यायला लागली आहे. सातारा पालिका निवडणूकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार, यावर शशीकांत शिंदे म्हणाले, मी व दीपक पवार आम्ही दोघेही नेतृत्व करून पण शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीत आले तर तेचे राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जनता दरबारात पालकमंत्री येतील.... 

पालकमंत्री मुंबईत जनता दरबार घेतात. पण सातारा जिल्ह्यातील जनता दरबारासाठी ते का उपस्थित राहात नाहीत, या प्रश्‍नावर शशीकांत शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार मी जनता दरबार सुरू केला. त्यास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण पालकमंत्र्यांनी या जनता दरबारास यायला हवे. त्यामुळे विविध कामानिमित्त ते दौऱ्यावर असल्याने त्यांना साताऱ्यातील जनता दरबारास उपस्थित राहता येत नसेल. पण आगामी जनता दरबारास पालकमंत्री उपस्थित राहतील, आम्ही दोघे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देऊ. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख