If milk is not getting proper price then what is the use of this government staying in power says MLA Shivendraraje Bhosale | Sarkarnama

दूधाला योग्य दर नसेल तर हे सरकार सत्तेत राहून उपयोग काय : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शेतकऱ्यांनी कोरोनाच्या परिस्थितीत शहरात व ग्रामीण भागातील लोकांना तारण्याचे काम केले. कोरोनाचे महाभयंकर संकट असताना शेतकरी शांत बसला नाही. विविध अडचणी असूनही शेतकऱ्याने रोजच्या रोज दूध, भाजीपाल्याचा पुरवठा केला. अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे

सातारा : कोरोनाचे महाभयंकर संकट असताना शेतकरी शांत बसला नाही. रोजच्या रोज दूध, भाजीपाला शहरी व ग्रामीण भागात पुरवत होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकारने करायला हवे. सरकार शेती पूरक व्यवसाय करावा, असे सांगत आहे. पण शेतकऱ्याच्या दूधाला योग्य दर मिळत नसेल तर हे सरकार सत्तेत राहून उपयोग काय, असा प्रश्‍न साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा शहरातआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पोवईनाका व मोती चौक येथे आंदोलन झाले.

यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे. कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही. तीन चाकी सरकारचा धिक्कार असो...अशी घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच निषेधाचे व मागण्यांचे फलक हाता घेऊन सोशल डिस्टसिंगचे पालन करत आंदोलन झाले. 

यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सध्या दूधासह शेती उत्पादनांना भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्याला न्याय मिळावा, दुधाला दर मिळावा. यासाठी राज्याभर भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज आंदोलन छेडले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आमची एकच मागणी आहे.

 शेतकऱ्यांनी कोरोनाच्या परिस्थितीत शहरात व ग्रामीण भागातील लोकांना तारण्याचे काम केले. कोरोनाचे महाभयंकर संकट असताना शेतकरी शांत बसला नाही. विविध अडचणी असूनही शेतकऱ्याने रोजच्या रोज दूध, भाजीपाल्याचा पुरवठा केला. अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे.

सरकार सातत्याने सांगतेय शेती पुरक व्यवसाय करा. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. असे असतानाही दूधाला योग्य दर मिळत नसेल तर हे सरकार सत्तेत राहून उपयोग काय, असा प्रश्‍न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित करून ते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांच्या या न्याय मागणीला योग्य पध्दतीने न्याय द्यावा. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा दिशा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले , जयदीप ठुसे, विठ्ठल बलशेटवार, अविनाश कदम, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, प्राची शहाणे, डॅनियल फरांदे, किशोर गोडबोले, किशोर पंडित, उपाध्यक्ष आप्पा कोरे, मनीषा पांडे, चंदन घोडके, रवी आपटे, संतोष प्रभुणे, अविनाश पवार, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख