शरद पवारांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी बांधले हातात राष्ट्रवादीचे घड्याळ  - I will not do any other work without NCP, assured former MLA Rajiv Awale today. | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी बांधले हातात राष्ट्रवादीचे घड्याळ 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

जिल्ह्याच्या दौऱ्यात ज्या ज्या वेळी पवारसाहेब व माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी मी कोणत्या पक्षात आहे, याची चर्चा न करता. सध्या राजीवचे काय चाललंय याचीच चौकशी केली. आम्हा सर्वांचे  वडीलधारी नेतृत्व म्हणून आम्ही पवार साहेबांकडे पाहतो.

सातारा : दहा वर्षात आमदार नसताना महाराष्ट्रातील मातंग समाजात जाऊन संघटना बांधण्याचे काम मी केलेले आहे. २०२१ मध्ये मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा दिसेल, असा विश्वास व्यक्त करून आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ही नेते मंडळी अडचणीच्या काळात पक्षात राहिलेली आहेत. त्यामुळे ही मंडळी सांगतील ते काम मी करणार आहे. भविष्यात पवार परिवाराने दिलेल्या प्रेमाची उत्तराई म्हणून राष्ट्रवादीशिवाय मी दुसरे कोणतेही काम करणार नाही, असा विश्वास माजी आमदार राजीव आवळे यांनी आज दिला. 

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी श्री. आवळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, खासदर सुप्रिया सुळे, जयप्रकाश पाटील, बी. के. चव्हाण, श्री. कारंडे, आबा आवळे, सुनील झंवर आदी उपस्थित होते.  

नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार म्हणून विधानसभेत काम करू लागलो, पण त्यावेळी जेवढा आनंद झाला नाही. तेवढा आनंद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करताना होत आहे, असे सांगून राजीव आवळे म्हणाले, राजकारणाची सुरवात कॉलेज जीवनापासून केली. पहिल्यापासून राजकारणामध्ये 'आयडॉल' कोणाला म्हणायचे, त्यावेळी काँलेजच्या बाहेर तरूणांसोबत चर्चा व्हायची. त्यावेळीपासून सातत्याने माझ्यासारखा कार्यकर्ता देशाचे नेते पवारसाहेबांवर प्रेम करणारा आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यात ज्या ज्या वेळी पवारसाहेब व माझी भेट झाली. त्यावेळी त्यांनी मी कोणत्या पक्षात आहे, याची चर्चा न करता. सध्या राजीवचे काय चाललंय याचीच चौकशी केली. आम्हा सर्वांचे  वडीलधारी नेतृत्व म्हणून आम्ही पवार साहेबांकडे पाहतो. कै. किसनराव आवळे यांनी महाराष्ट्रातील मातंग समाजाचा मेळावा इचलकरंजी आयोजित केला होता. त्यावेळी या मेळाव्यास समाजाचे एक लाख लोक आले होते.

या मेळाव्यास शरद पवार साहेब आले होते. त्यानंतर आमच्या वडीलांचे निधन झाले. त्यावेळी पवार साहेबांनी घरी येऊन आम्हा सर्व भावंडांचे सांत्वन केले होते. आमच्या डोक्यावर असलेला पवार साहेबांचा पितृतुल्य हात आम्ही कधी विसरलेलो नाही. पण राजकारणात आमच्या जिल्ह्याची राष्ट्रवादी व काँग्रेस अशी विभागाणी झाली. आमचा मतदारसंघ काँग्रेसमध्ये गेला. मला विधानसभा लढवायचे होते, त्यातच तालुक्यात संघटना निर्माण केली होती. त्यावेळी जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली मी निवडुन आलो व आमदार झालो. पण तरीही मी समर्थन देताना राष्ट्रवादीच्या पाठीशीच राहिलो. 

१९९९ मध्ये पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी मी इचलकरंजीचा नगराध्यक्ष होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते आवाडे साहेब यांनी आम्हाला बोलावून कोणासोबत जायचे याविषयी चर्चा केली. आम्ही त्यावेळी श्री. पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारूया, असे आम्ही ठरविले होते. पण काँग्रेसने निष्ठावंताना डावलून धनिकांना संधी दिली. त्यावेळी मी ठरविले मी मनाचा राजा आहे. योगायोगाने कारंडे साहेबांच्या कार्यक्रमास मुश्रीफसाहेब येणार होते.

त्यावेळी कारंडे साहेब म्हणाले तुमच्या सारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीत येणे गरजेचे आहे. माझ्या मनातील भावनेला त्यांनी हात घातला. गेली महिनाभरापासून मी राष्ट्रवादीत प्रवेशाची वाट पहात होतो.. पण मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करायचा होता. कोल्हापूरात हा कार्यक्रम घेता आला असता. पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मंत्रालयात चालले होते. त्यावेळी दादांनी गाडी थांबवून माझी चौकशी केली होती. त्यामुळे जे प्रेम पवार साहेबांपासून दादांपर्यंत मिळाले त्या प्रेमाची उतराई भविष्यात मला करावी लागणार आहे.

दादा वेळेला महत्व देणारे नेते आहेत. यानिमित्ताने आमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. आमदार नसताना कामानिमित्त ज्या ज्यावेळी मी दादांना भेटलो, त्यावेळी दादांनी माझ्या वाटचालीची आस्तेवाईकपणे चौकशी केली. हे आपले पण मला राष्ट्रवादीतच मिळाले. म्हणून मुश्रीफ साहेब व ए. वाय. साहेब भविष्यात राष्ट्रवादीतच काम करणार आहे. दादांनी मला वेळ आणि जिल्हा सांगावा, त्याठिकाणी मी मातंग व बहुजन समाजाचा मेळावा घेण्यास एका पायावर मी तयार आहे. 

आमदार नव्हतो त्यावेळी दहा वर्षात महाराष्ट्रात तमाम मातंग समाजाला एकत्र करण्याचे काम मी केले आहे. चळवळीचे बळ घरातून मिळाले. कै. किसन आण्णापासून राजकिय व सामाजिक जीवनाला बळ मिळाले. त्या जोरावर मी सामाजिक कामात करू लागलो. दहा वर्षात आमदार नसताना महाराष्ट्रातील मातंग समाजात जाऊन संघटना बांधण्याचे काम मी केलेले आहे. २०२१ मध्ये मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची नेते मंडळी अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिली आहेत. त्यामुळे ही मंडळी सांगतील ते काम मी करणार आहे.  भविष्यात पवार परिवाराने दिलेल्या प्रेमाची उत्तराई म्हणून राष्ट्रवादीशिवाय मी दुसरे काम करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या योग्यतेचे काम करून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख