साताऱ्यात पश्चिमेकडे संततधार; कोयनेतून उद्या पाणी सोडणार, पुल खचल्याने आंबेनळी घाट बंद - Heavy rain in west Satara; Water will be released from Koyna tomorrow, Ambenli Ghat closed due to bridge erosion | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

साताऱ्यात पश्चिमेकडे संततधार; कोयनेतून उद्या पाणी सोडणार, पुल खचल्याने आंबेनळी घाट बंद

उमेश बांबरे
गुरुवार, 22 जुलै 2021

 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरण वगळता उर्वरित तीन धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

सातारा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. तर कोयना धरणातून उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता कोयना नदीपात्रात दहा हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. संततधार पावसामुळे मेढा-महाबळेश्वर मार्गावरील पुल वाहून गेला आहे. तर कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे संगममाहूली येथील कैलास स्मशानभूमीतील कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या शवदाहिन्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर दुसरीकडे आंबेनळी घाटात अन्नपुर्णा हॉटेलजवळ पुलाची बाजू खचल्याने या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. Heavy rain in west Satara; Water will be released from Koyna tomorrow, Ambenli Ghat closed due to bridge erosion

पावसाने यावर्षी थोडी उशीरा सुरवात केली. तरणा पाऊस कोरडा गेल्याने यावर्षी पाऊस पडणार का, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झाली होती. मात्र, तरण्या पावसानंतर आलेल्या म्हाताऱ्या पावसाने दमदार सुरवात केली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पश्चिमेकडील तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : परमबिरसिंह यांनी व्यापाऱ्याकडे मागितली खंडणी; गुन्हा दाखल

महाबळेश्वर जवळील वेण्णालेख ओव्हरफ्लो झाला आहे. तर मेढा-महाबळेश्वर मार्गावरील पुल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरण वगळता उर्वरित तीन धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. 

आवश्य वाचा : ..अन् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला

कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात 92 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत 2.27 मीटरने वाढ झाली असुन सरासरी पाणी आवक 12331 क्युसेस आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज धरणातून 5000 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. 

उरमोडी धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी सात वाजता उरमोडी धरणाच्या सांडव्याचे चारही वक्रद्वारे 0.50 मीटरवरून 1.00 मीटरपर्यंत उचलून सांडव्यातून 3601 क्युसेस व विद्युत गृहातून 500 क्युसेस असा एकूण 4101 क्युसेस विसर्ग उरमोडी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व गावांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन धरण विभागाकडून करण्यात आले आहे.

 तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 233 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत 3.90 मीटरने वाढ झाली असुन सरासरी पाणी आवक 7771 क्युसेस आहे. धरणातून सायंकाळी पाच वाजता 8000 क्युसेस विसर्ग नदी पात्रात करण्यात येणार आहे. 

कोयना धरण आज (गुरूवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 2133 फूट दोन इंच झाली आहे. धरणात 72.88 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची सांडवा पातळी 2133 फूट सहा इंच आहे. या पातळीस पाणीसाठा 73.18 टीएमसी आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता धरणातून नदीपात्रात एकूण दहा हजार  क्युसेस विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना
नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख