उंडाळकरांच्या सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्र्यांचा शड्डू; उदयसिंह पाटलांची अडचण - Guardian Minister Balasaheb Patil will contest from Karad Society constituency | Politics Marathi News - Sarkarnama

उंडाळकरांच्या सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्र्यांचा शड्डू; उदयसिंह पाटलांची अडचण

हेमंत पवार 
बुधवार, 24 मार्च 2021

सोसायटी गटात 140 मते आहेत. त्यातील सर्वाधिक मते उंडाळकर गट आणि पालकमंत्र्यांकडे आहेत. त्याचबरोबर भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाकडेही त्याखालोखाल मते आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडेही काही सोसायट्यांची स्वतःची मते आहेत. पालकमंत्री आणि ॲड. उदयसिंह उंडाळकर हे दोघेही सोसायटी गटावर ठाम आहेत.

कऱ्हाड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सोसायटी गटातून गेली 50 वर्षे (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी प्रतिनिधित्व केले. या गटातून त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह हे निवडणूक लढवणार आहेत. त्यातच पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही याच गटातून निवडणूक लढवण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे मतविभाजनाचा बसणारा फटका टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कोणता तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक लवकरच होणार आहे. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली ही बॅंक आपल्याच पक्षाच्या ताब्यात राहावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत बॅंकेच्या निवडणुकीसाठी काही बैठका होऊन निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांतील निर्णयावर बिनविरोधचा निर्णय होईल. 

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळावर जाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते इच्छुक आहेत. त्यासाठी या नेत्यांनी सहा महिन्यांपासूनच मतांची गोळाबेरीज सुरू केली आहे. यावेळची निवडणूक बॅंकेत संचालक म्हणून सोसायटी गटातून गेली 50 वर्षे प्रतिनिधित्व केलेले आणि बॅंकेला सलग सहा वेळा देशपातळीवरील "नाबार्ड'चा पुरस्कार मिळवून देणारे (कै.) विलासराव पाटील- उंडाळकर यांच्याविना होत आहे.

त्यांनी सोसायटी गटावर हयातभर वर्चस्व ठेवले. त्याच गटातून निवडणूक लढवण्यासाठी ॲड. उदयसिंह तयारीत आहेत. त्यांनी त्यासाठी सोसायटींच्या ठरावाचीही तयारी केली आहे. मात्र, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सोसायटी गटातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत राखलेला संयम आणि त्यांच्याकडे असलेल्या पदाचा विचार करून नेतेही त्यांची याच गटातील उमेदवारी कायम ठेवतील, अशीही शक्‍यता आहे.

सोसायटी गटात 140 मते आहेत. त्यातील सर्वाधिक मते उंडाळकर गट आणि पालकमंत्र्यांकडे आहेत. त्याचबरोबर भाजपचे अतुल भोसले यांच्या गटाकडेही त्याखालोखाल मते आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्याकडेही काही सोसायट्यांची स्वतःची मते आहेत. पालकमंत्री आणि ॲड. उदयसिंह उंडाळकर हे दोघेही सोसायटी गटावर ठाम आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या ट्‌विस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय तोडगा काढणार यावर या मतदारसंघातील निवडणूकीचे गणित अवलंबून राहणार आहे. 

उत्पादक गट की स्वीकृत संचालक

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातील ही लढत थोपवण्यासाठी ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना उत्पादक संस्था गटातून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. त्याही गटात काही अडचण निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यासमोर स्वीकृत संचालकाचा पर्याय ठेवला जाण्याचीही शक्‍यता आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख