माथाडी कामगारांना न्याय द्या, अन्यथा परिणाम भोगा : नरेंद्र पाटील आक्रमक  - Give justice to Mathadi workers, otherwise suffer the consequences: Narendra Patil aggressive | Politics Marathi News - Sarkarnama

माथाडी कामगारांना न्याय द्या, अन्यथा परिणाम भोगा : नरेंद्र पाटील आक्रमक 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास रेल्वे, बससेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून संघटनेने सतत मागणी केलेली आहे.मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कमालीचा असंतोष पसरला आहे.

ढेबेवाडी : माथाडी कामगारांसह संलग्न अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करुन त्यांना रेल्वे व बसने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्यांवर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. यासाठी काल (शुक्रवार) पासून नवी मुंबई येथे माथाडी कामगारांनी संप पुकारला. कष्टकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा पुढील परिणामांना तुम्हीच जबाबदार रहाल, असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शासनाला दिला आहे. 

मुंबईत रेल्वेने कामाच्या ठिकाणी निघालेल्या माथाडी कामगारांना ते अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ठ नसल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अडविल्याने महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने संताप व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने आदेश न काढल्यास काम बंदचा इशारा दिला होता. 

रात्री उशिरापर्यंत शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी तेथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अन्न-धान्य, कांदा-बटाटा, मसाला, भाजीपाला, फळे आदीसह अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या एकाही गाडीत मालाची चढ-उतार न करण्याचा पावित्रा कामगारांनी घेतला. नरेंद्र पाटील म्हणाले,"लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून माथाडी व संलग्न घटक जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत, या घटकाला अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ठ करावे.

विमा संरक्षण द्यावे. त्यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास रेल्वे, बससेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून संघटनेने सतत मागणी केलेली आहे. मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने कमालीचा असंतोष पसरला आहे. गेल्या वर्षी कोरोनाने अनेक कामगारांचा मृत्यू झाला,त्यांच्या कुटुंबाला मदतीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. तातडीने याबाबत निर्णय न झाल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासनाची राहील.'' 

''कोरोनाच्या महाभयंकर संकटात देखिल कष्टाची कामे करणारा माथाडी व अन्य घटक हा सुद्धा माणूसच आहे, त्याचाही जीव आहे, त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, न्याय द्या''. 
- नरेंद्र पाटील  (माथाडी कामगारांचे नेते) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख