गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार; या पदांवर संधी   - Gayatri Devi will be active again; Opportunity in these positions | Politics Marathi News - Sarkarnama

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार; या पदांवर संधी  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

यावेळेस गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नावाचा सोसायटीतून ठराव आहे. तर महिला राखीव प्रवर्गातून दोन संचालक घेतले जातात. त्यामुळे सोसायटीतून प्रभाकर घार्गे यांना पुन्हा संधी दिल्यास गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना महिला राखीव मतदारसंघातून संचालकपदी संधी दिली जाऊ शकते. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय निर्णय घेतला जाणार, हे महत्त्वाचे आहे.

सातारा : जिल्हा बॅंकेतील राखीव जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत राखीव पाच जागांपैकी दोन जागा या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आल्या होत्या. उर्वरित दोन जागांवर राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती. यावेळेस महिला राखीवमधून जिल्हा बॅंकेवर कोण संचालक होणार याची उत्सुकता आहे. औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा खटाव तालुक्‍यातील सोसायटीतून ठराव करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना सोसायटी मतदारसंघातून की महिला राखीवमधून संचालकपदी संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 
 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी ठराव करण्यास सुरवात केली आहे. मागील वेळी ज्या ठिकाणी ठरावांची प्रक्रिया थांबली होती, तेथून पुढे प्रक्रिया सुरू होणार आहे. आतापर्यंत सोसायटी मतदारसंघातून तालुकानिहाय इच्छुकांनी आपापले ठराव केले आहेत. सोसायटी मतदारसंघातून 11 संचालक निवडून येतात. मागील वेळी संचालक मंडळात भाजपचे दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ तर कॉंग्रेसचा एक संचालक बिनविरोध निवडून आला होता. 

आता यावेळेस प्रत्येक तालुक्‍यातून राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपच्या नेत्यांनी सोसायट्यांचे ठराव करून पाठविले आहेत. यामध्ये खटाव तालुक्‍यातून औंध संस्थांनच्या सर्वेसर्वा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नावाचेही ठराव करण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून त्या जिल्हा बॅंकेवर येऊ शकतात. मागील वेळी प्रभाकर घार्गे हे खटाव तालुक्‍यातून जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून आलेले आहेत.

यावेळेस गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नावाचा सोसायटीतून ठराव आहे. तर महिला राखीव प्रवर्गातून दोन संचालक घेतले जातात. त्यामुळे सोसायटीतून प्रभाकर घार्गे यांना पुन्हा संधी दिल्यास गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना महिला राखीव मतदारसंघातून संचालकपदी संधी दिली जाऊ शकते. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय निर्णय घेतला जाणार, हे महत्त्वाचे आहे. मागील वेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळेस सोसायटी किंवा महिला राखीवमधून संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

 

अजित पवार कोणाचे नाव सूचविणार...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच संचालकपदी कोणाला संधी द्यायची, हे ठरणार आहे. मागील वेळी महिला राखीवमधून सुरेखा पाटील (कोरेगाव) व कांचन साळुंखे (देगाव, सातारा) या दोन सर्वसामान्य महिलांना संचालकपदावर संधी दिली होती. त्यामुळे यावेळेस श्री. पवार कोणाची नावे सुचविणार, हेही महत्त्वाचे आहे. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख