ऑक्सिजनच्या टॅंकरसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांत चार तास वाद.... - Four hours dispute between two collectors for oxygen tanker .... | Politics Marathi News - Sarkarnama

ऑक्सिजनच्या टॅंकरसाठी दोन जिल्हाधिकाऱ्यांत चार तास वाद....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

सायंकाळी सात वाजता हा टॅंकर पोलिस बंदोबस्तात साताऱ्यातील जिल्हा रूग्णालय व जंबो हॉस्पिटलमध्ये खाली करून घेतला. या टॅंकरमध्ये 15 मेट्रिक टन ऑक्‍सिजन होता. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारा हा टॅंकर जिल्हाधिकाऱ्यांच्या परखड भूमिकेमुळे साताऱ्यात खाली करता आला. 

सातारा : ऑक्‍सिजनचा तुटवडा असताना सातारा जिल्ह्यासाठी आलेला ऑक्‍सिजन टॅंकर कोल्हापूरला नेण्याचा डाव आज सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परखड भूमिकेमुळे फसला. या टॅंकरवरून दोन जिल्हाधिकाऱ्यांत चांगलीच जुंपली. चार तासांच्या वादावादीनंतर सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह वरचढ ठरले. शेवटी पोलिस बंदोबस्तात ऑक्‍सिजन टॅंकर सातारा जिल्हा रूग्णालयात नेऊन खाली करण्यात आला. 

राज्यभर ऑक्‍सिजनचा तुटवडा असून सध्या सातारा जिल्ह्यातही ऑक्‍सिजनची टंचाई आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऑक्‍सिजनचा टॅंकर दिला जात आहे. आज दुपारी सातारा जिल्ह्यासाठी आलेला ऑक्‍सिजनचा टॅंकर पोलिस बंदोबस्तात पुण्याहून आणण्यात आला. पण हा टॅंकर कोल्हापूर जिल्ह्यासाठी असल्याचे सांगून चालक कोल्हापूरकडे घेऊन निघाला होता.

पण, दुपारी चारच्या सुमारास वाढे फाटा येथे सातारा पोलिसांनी हा टॅंकर आडविला. मात्र, टॅंकर चालकाने आम्हाला हा टॅंकर कोल्हापूरला घेऊन जाण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. त्यामुळे हा टॅंकर नेमका कोणाचा, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्यात ऑक्‍सिजन टॅंकरवरून चांगलीच जुंपली. दोघांनी आपापली ताकद लावली.

सुमारे तीन तास या टॅंकरवरून दोन जिल्हाधिकाऱ्यांत खल सुरू होता. अखेर यामध्ये साताऱ्याचे जिल्हाधिकारी वरचढ ठरले. त्यांनी सायंकाळी सात वाजता हा टॅंकर पोलिस बंदोबस्तात साताऱ्यातील जिल्हा रूग्णालय व जंबो हॉस्पिटलमध्ये खाली करून घेतला. या टॅंकरमध्ये 15 मेट्रिक टन ऑक्‍सिजन होता. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारा हा टॅंकर जिल्हाधिकाऱ्यांच्या परखड भूमिकेमुळे साताऱ्यात खाली करता आला. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख